सहाय्यक पोलीस निरीक्षक जयेंद्र पगारे यांना “टॉप कॉप ऑफ द मंथ” पुरस्काराने सन्मानित

जे बी एन महाराष्ट्र न्यूज, जामनेरप्रतिनिधी: सुपडू जाधव जामनेर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जयेंद्र सुपडू पगारे (A.S.I. 2651) यांना त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल “टॉप कॉप ऑफ द मंथ” या प्रतिष्ठित पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पाचोरा उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाच्या वतीने फेब्रुवारी 2025 महिन्यासाठी हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. पोलीस दलातील उल्लेखनीय सेवा आणि कर्तव्यनिष्ठ कार्यगिरीबद्दल त्यांना प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. सत्कार समारंभात पाचोरा उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. धनंजय येरुळे यांच्या हस्ते जयेंद्र पगारे यांना हा सन्मान प्रदान करण्यात आला. या वेळी जामनेर पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक मुरलीधर कासार उपस्थित होते. त्यांनी जयेंद्र पगारे यांच्या कार्याचे कौतुक करत त्यांना शुभेच्छा दिल्या. कर्तव्यदक्षता आणि जनसेवेसाठी समर्पित अधिकाऱ्यांना हा पुरस्कार प्रदान केला जातो. जयेंद्र पगारे यांच्या सन्मानामुळे जामनेर पोलीस दलात आनंदाचे वातावरण असून, त्यांच्या पुढील कार्यासाठी सहकाऱ्यांकडून शुभेच्छा व्यक्त केल्या जात आहेत.

Read More

आजी-माजी सैनिकांच्या प्रश्नांवर तालुका स्तरीय समितीची बैठक संपन्न

जामनेर, ५ मार्च (जे. बी. एन. महाराष्ट्र न्यूज) – तालुक्यातील आजी-माजी सैनिक, शहीद सैनिक कुटुंबे, माजी सैनिक विधवा तसेच कार्यरत सैनिकांच्या शासकीय कामांसाठी तत्काळ उपाययोजना करण्याच्या दृष्टीने तालुका स्तरीय समितीची बैठक आयोजित करण्यात आली. तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या बैठकीत विविध विभागांशी संबंधित शासकीय प्रक्रिया जलद आणि प्राधान्याने पूर्ण करण्याबाबत चर्चा करण्यात आली. बैठकीस जामनेरचे गटविकास अधिकारी श्री. काळे, पोलीस निरीक्षक श्री. मुरलीधर कासार, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी श्री. संजय गायकवाड तसेच माजी सैनिक संघटनेचे पदाधिकारी आणि सदस्य उपस्थित होते. या चर्चासत्रात माजी सैनिकांच्या प्रलंबित शासकीय कामांबाबत सविस्तर आढावा घेण्यात आला. तसेच, त्यांच्या कल्याणासाठी असलेल्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याचे ठरले. ही बैठक यशस्वी ठरल्यास तालुक्यातील आजी-माजी सैनिक आणि त्यांच्या कुटुंबीयांना शासनाच्या विविध लाभदायक योजनांचा जलद लाभ मिळू शकणार आहे, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

Read More

तलावातील गाळ काढण्यासाठी BJS कार्यकर्त्यांची जिल्हाधिकाऱ्यांसोबत महत्त्वपूर्ण बैठक

जामनेर, ५ मार्च (जे. बी. एन. महाराष्ट्र न्यूज): जळगाव जिल्ह्यातील तलावांचे पुनरुज्जीवन आणि जलस्रोत संवर्धनाच्या उद्देशाने भारतीय जैन संघटना (BJS) आणि जिल्हा प्रशासन यांच्यात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत तलावातील गाळ काढण्यासह गाळयुक्त शिवार, गाळमुक्त बंधारे, नाला खोलीकरण यासारख्या विषयांवर सखोल चर्चा करण्यात आली. बैठकीला जळगावचे जिल्हाधिकारी मा. आयुष प्रसाद, उपजिल्हाधिकारी श्रीमती अर्चना मोरे, जलसंधारण विभागाचे अधिकारी आणि इतर संबंधित अधिकारी उपस्थित होते. तसेच BJS संघटनेचे राज्य उपाध्यक्ष श्री विनय पारख, जलप्रकल्प जिल्हा प्रमुख सुमीत मुणोत, जळगाव तालुका प्रमुख पंकज जैन, रावेर तालुका प्रमुख देवेंद्र शाह व उज्वल देरेकर, भुसावळ तालुका प्रमुख चेतन जैन, धरणगाव तालुका प्रमुख नीलेश ओस्तवाल, BJS जळगाव अध्यक्ष अजय राखेचा आणि जिल्हा समन्वयक गणेश कोळी यांनीही सहभाग घेतला. BJS कार्यकर्त्यांनी या बैठकीत शेतकऱ्यांना तलावातील गाळ शेतात नेण्यासाठी जनजागृती करण्याचा संकल्प केला. या मोहिमेच्या प्रचारासाठी १५ तालुक्यांतील BJS पदाधिकारी आणि कार्यकर्ते गावागावात जाऊन शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणार असल्याचे विनय पारख यांनी सांगितले. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी प्रत्येक तालुक्यातील तहसीलदार, गटविकास अधिकारी (BDO) आणि सरपंच यांच्यासोबत लवकरच बैठक घेण्याचे निर्देश दिले. तसेच या बैठकीत BJS कार्यकर्त्यांना आमंत्रित करण्याचे आश्वासन दिले. ही मोहीम यशस्वी झाल्यास जिल्ह्यातील तलाव व जलस्रोतांचे पुनरुज्जीवन होईल आणि शेतकऱ्यांना सुपीक गाळ उपलब्ध होईल, असा विश्वास जिल्हाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

Read More

जामनेर शहरात महाराष्ट्र भूषण डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जयंतीनिमित्त स्वच्छता अभियानाचे आयोजन…

प्रतिनिधी -सुपडू जाधवमहाराष्ट्र भूषण आदरणीय तीर्थरूप डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र भूषण आदरणीय तीर्थरूप डॉ. श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने जामनेर शहरात विशेष स्वच्छता अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे.हे स्वच्छता अभियान रविवार, दिनांक 2 मार्च 2025 रोजी सकाळी 8:30 वाजता नगरपरिषद चौक, जामनेर येथे सुरू होणार आहे. या अभियानाचा शुभारंभ राज्याचे जलसंपदा मंत्री श्री. गिरीशभाऊ महाजन आणि जामनेर माजी नगराध्यक्षा सौ. साधनाताई महाजन यांच्या हस्ते होणार आहे.शहर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी हा उपक्रम महत्त्वाचा असून, नागरिकांनी या अभियानात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले आहे. स्वच्छ भारत मिशनला चालना देण्यासाठी हा उपक्रम उपयुक्त ठरणार आहे.या अभियानात स्थानिक नागरिक, प्रतिष्ठानचे कार्यकर्ते, नगरपरिषद कर्मचारी, विविध सामाजिक संघटनांचे कार्यकर्ते, विद्यार्थी आणि प्रतिष्ठित व्यक्ती मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. जामनेर शहराच्या स्वच्छतेसाठी हा उपक्रम महत्त्वाचा ठरणार असल्याने नागरिकांनी स्वतः सहभागी होऊन सामाजिक योगदान द्यावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

Read More

जामनेर येथून आरोपीस अटक – बेटावद खुर्द (ता. जामनेर) येथे केली होती घरफोडी

जे.बी.एन महाराष्ट्र न्यूज जामनेरजळगाव: बेटावद खुर्द (ता. जामनेर) येथे झालेल्या घरफोडीच्या गुन्ह्यातील मुख्य आरोपी समीर उर्फ बाल्या याला जामनेर येथून स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे. या कारवाईमुळे स्थानिक नागरिकांनी पोलिसांचे कौतुक केले असून, पोलिस प्रशासनाने पुन्हा एकदा सिद्ध केले की, कायद्यापासून कोणीही सुटू शकत नाही. दि. ८ फेब्रुवारी २०२५ रोजी बेटावद खुर्द (ता. जामनेर) येथे घरफोडीची घटना घडली होती. अज्ञात व्यक्तीने एका बंद घराचे कुलूप तोडून रोख रक्कम आणि मौल्यवान वस्तू लंपास केल्या होत्या. या प्रकरणी जामनेर पोलीस ठाण्यात सीसीटीएनएस क्रमांक ६०/२०२५, भादंवि कलम ३०५ , 331 (४) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला होता. गुप्त माहितीवरून जामनेरमध्ये अटक: गुन्हा घडल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला असता, आरोपी जामनेर येथे लपून बसल्याची गुप्त माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जामनेर येथे सापळा रचून आरोपीला अटक केली. पोलीस प्रशासनाची जलद कारवाई: 🔹 घरफोडीप्रकरणी तपास सुरू असताना, आरोपी जामनेर येथे असल्याची खात्रीशीर माहिती पोलिसांना मिळाली.🔹 स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी तत्काळ कारवाई करत आरोपीला ताब्यात घेतले.🔹 बेटावद खुर्द (ता. जामनेर) येथील घरफोडी प्रकरणातील हा मुख्य आरोपी असल्याचे निष्पन्न झाले. गुन्हेगारांवर वचक निर्माण करणारी पोलीस यंत्रणा या यशस्वी कारवाईमुळे पोलिस प्रशासनाने दाखवून दिले की, गुन्हेगार कितीही लपण्याचा प्रयत्न करत असले तरी कायद्याच्या कचाट्यातून सुटू शकत नाहीत. पोलिसांच्या या त्वरित हालचालीमुळे परिसरातील नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. पोलीस अधिकाऱ्यांचे विशेष योगदान: या कारवाईत स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस उपनिरीक्षक डोमाळे , पो.हे.का विनोद पाटील , पो.ना रणजीत जाधव, पो.का ईश्वर पाटील, पो.का राहुल महाजन तसेच जामनेर पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांच्या उत्कृष्ट समन्वयामुळे आरोपीस तात्काळ अटक करण्यात आली. पोलिसांचा नागरिकांना संदेश: ➡ कोणतीही संशयास्पद व्यक्ती आढळल्यास त्वरित पोलिसांशी संपर्क साधावा.➡ गुन्हेगारी प्रवृत्तीवर आळा घालण्यासाठी नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करावे.➡ घरफोडी, चोरी यासारख्या घटनांना आळा घालण्यासाठी पोलिस प्रशासन सतर्क आहे. गावकऱ्यांकडून पोलिसांचे कौतुक: या जलद कारवाईमुळे बेटावद खुर्द (ता. जामनेर) आणि जामनेर परिसरातील नागरिकांनी जळगाव पोलीस प्रशासनाचे आभार मानले आहेत. पोलिसांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे भविष्यात अशा कठोर कारवाया सुरूच राहाव्यात अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. ➡ “कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत,” असे स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

Read More

वाघूर उपसा सिंचन योजना – शेतकऱ्यांसाठी जलसंपन्न भविष्य!

जामनेर ( प्रतिनिधी सुपडू जाधव )जामनेर –जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी मोठी संधी! वाघूर उपसा सिंचन योजना क्र. 1 अंतर्गत 2020 शेततळ्यांच्या निर्मितीचे काम वेगाने सुरू असून, जिल्हा प्रशासन शेतकऱ्यांपर्यंत पोहोचून त्यांच्या शंका दूर करत आहे. 💬 शेतकरी व ग्रामस्थांशी थेट संवाद!आज अधीक्षक अभियंता श्री. यशवंत भदाणे, तहसीलदार श्री. नानासाहेब आगळे आणि जलसंपदा विभागाचे अधिकारी यांनी जामनेर तालुक्यातील गावे भेट देऊन शेतकरी व ग्रामस्थांशी चर्चा केली. या योजनेमुळे शेतकऱ्यांना पाण्याची शाश्वती मिळेल आणि शेती अधिक फायदेशीर ठरेल. जलसंवर्धन व जलद शेततळे निर्मितीसाठी जलसंपदा मंत्री ना. श्री. गिरीश महाजन हे आग्रही!या प्रकल्पाची गती वाढवण्यासाठी ना. गिरीश महाजन हे जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून नियमित आढावा घेत असून, प्रकल्प लवकर पूर्ण व्हावा यासाठी प्रयत्नशील आहेत. पालकमंत्री ना. श्री. गुलाबराव पाटील यांचे विशेष लक्ष!जिल्ह्यातील शेती सुजलाम सुफलाम व्हावी, यासाठी पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील हे देखील प्रकल्पावर लक्ष ठेऊन असून, शेतकऱ्यांना सिंचन सुविधा वेळेत मिळावी यासाठी मार्गदर्शन करत आहेत.

Read More

जामनेर बस स्थानकात गर्दीचा फायदा घेत चोरट्यांचा दोन महिलांच्या गळ्यातील मंगळसुत्रांवर डल्ला..

जामनेर,दि.17. प्रतिनिधी~ जामनेरहून भुसावळ ला जाणाऱ्या बस मध्ये चढणाऱ्या दोन महिलांच्या गळ्यातील गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी मंगळसूत्र लंपास केल्याची घटना घडली असून जामनेर बस स्थानक परिसरात चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे पोलीस प्रशासनाने नियमित पोलीस कर्मचाऱ्याची नियुक्ती करण्याची मागणी सुज्ञ नागरिकांतून केल्या जात आहे.∆सविस्तर वृत्त असे की,आज सकाळी 11 वाजेच्या सुमारास जामनेर बस स्थानकात पुणे~भुसावळ बस क्र.MH.20,BL.4020 उभी होती आणि या ठिकाणी जामनेर हून कुऱ्हा(पानाचे) येथे जाण्यासाठी उभ्या असलेल्या जयश्री पाटील व प्रतिभा तायडे या दोन महिला बस मध्ये गर्दीत चढत असताना गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र लंपास केले.चोरी झाल्याचा प्रकार लक्षात येताच या दोन्ही महिलांनी बस मधील प्रवाशांची ड्रायव्हर , कंडक्टर यांना झडती घ्यायला सांगितले.परंतु काहीही मिळून आले नाही.या दोन्ही महिलांनी तात्काळ पोलीस स्टेशन गाठत घडलेला प्रकार सांगितला.दोन्ही महिलांच्या फिर्यादी वरून जामनेर पोलीसात अज्ञात चोरट्यां विरोधात गुन्हा दाखल करण्यात आले आहे.राज्य सरकारने महिलांना एस.टी. प्रवास भाड्यात सवलत दिल्याने दिवसा गणिक एस.टी.ने प्रवास करणाऱ्यात महिला प्रवाशांची संख्या वाढत आहे.राज्यातील प्रत्येक बस स्थानका वर बसने प्रवास करणाऱ्या पुरुषां पेक्षा महिलांची अधिक गर्दी पाहायला मिळत आहे.सध्या लग्न सराई चे दिवस असून प्रत्येक बस स्थानकात प्रचंड गर्दी पाहायला मिळत आहे,या गर्दीचा फायदा घेत चोरीच्या घटना घडत आहेत.जामनेर बस स्थानकावर देखील प्रवाश्यांची दररोज गर्दी पाहायला मिळत आहे.गेल्या काही दिवसां पासून या बस स्थानकावर चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून दर दिवसाआड येथे चोरीच्या घटना घडत आहेत.कुणाचा खिसा कापला जातो,तर कुणाची बॅग लंपास तर कुणाच्या गळ्यातील मंगळसूत्र,चैन,कानातील दागिन्यांवर चोरटे बिनधास्त डल्ला मारत असतात.सध्या बाजारपेठेत सोन्याचे दर हे दिवसागणिक गगनाला भिडत असून सर्वसामान्यांना आजघडीला सोने खरेदी करणे अवक्या बाहेरची बाब असतांना चोरट्यांची मात्र या चोरी सत्रामुळे चांगलीच चांदी होत असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे.काही वर्षांपूर्वी जुने बस स्थानक असताना या बस स्थानक परिसरात होणाऱ्या चोऱ्यांचे प्रमाण रोखण्यासाठी स्वतंत्र पोलीस चौकी कार्यरत होती.मात्र नवीन बस स्थानक झाल्या नंतर या ठिकाणी एखादा पोलीस कर्मचारी देखील कार्यरत नसल्याने चोरट्यांचे चांगलेच फावले आहे.चोऱ्यांचे प्रमाण रोखण्यासाठी जामनेर पोलीस स्टेशनच्या वतीने या बस स्थानकावर नियमित दोन पोलीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात यावी अशी मागणी सुज्ञ नागरिकांतून केल्या जात आहे.

Read More

ज्ञानगंगा विद्यालयाच्या विद्यार्थ्यांची ग्रामपंचायतींना शैक्षणिक क्षेत्रभेट

ता.जामनेर __ : ज्ञानगंगा माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी आपल्या गावातील ग्रामपंचायतींना भेट देऊन लोकशाही प्रक्रियेमध्ये सक्रिय सहभागाचा अनुभव घेतला. हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाच्या पुस्तकाबाहेरचा अनोखा अनुभव ठरला. या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांनी आंबीलहोळ, पळसखेडे, वाकी आणि तळेगाव येथील ग्रामपंचायतींना भेट देऊन त्यांच्या कामकाजाविषयी सखोल माहिती घेतली. त्यांनी ग्रामपंचायतीच्या अधिकार, कर्तव्ये, गावाच्या विकासासाठी होणारे उपक्रम आणि ग्रामसभेच्या कार्यपद्धतीविषयी समजून घेतले. सरपंच, ग्रामसेवक आणि ग्रामपंचायत सदस्यांशी संवाद साधून त्यांनी शासकीय योजनांविषयी आणि ग्रामविकासाबाबत माहिती मिळवली. श्री. विजय कोळी, श्री. विनय खोंडे, श्री. विलास पाटील, श्री. अनिल देशमुख, श्री. रुपेश क्षिरसागर, सौ. स्नेहल पाटील, सौ. वंदना उंबरकर, सौ. मनीषा भारंबे आणि सौ. रोहिणी चौधरी मॅडम यांच्या सहकार्याने हा उपक्रम यशस्वी झाला. या क्षेत्रभेटीमुळे विद्यार्थ्यांमध्ये ग्रामपंचायतीच्या कार्यप्रणालीविषयी जागरूकता निर्माण झाली. तसेच, भविष्यात गावाच्या विकासात योगदान देण्यासाठी त्यांना प्रेरणा मिळाली. विद्यालयाचे प्राचार्य श्री. आर. जे. सोनवणे, श्री. अशोक पालवे, सरपंच श्री. भिका तायडे, श्री. ललीत लामखेडे, श्री. राजेंद्र खरे, सौ. आरतीताई कोळी, दिलीप चव्हाण, प्रशांत वाघ, ग्रामसेवक श्री. योगेश पालवे, सौ. उज्वला महाजन, श्री. व्ही. एम. पवार, श्री. चिंतामण राठोड तसेच पालक व ग्रामस्थ यांच्या विशेष मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभव घेण्याची संधी मिळाली. या अनोख्या कृतीयुक्त उपक्रमाचे ग्रामस्थांनी स्वागत केले असून विद्यार्थ्यांनी केवळ पुस्तकी ज्ञान न घेता प्रत्यक्ष अनुभव मिळवल्याने त्यांना भविष्यात मोठा फायदा होईल, असे प्राचार्य श्री. आर. जे. सोनवणे यांनी वाकी येथे झालेल्या क्षेत्रभेटीच्या वेळी सांगितले.

Read More

निळकंठ पंढरीनाथ पाटील विद्यालयात दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप व बक्षीस वितरण समारंभ उत्साहात संपन्न

पळासखेडे मिराचे – धी. शेंदुर्णी सेकंडरी एज्युकेशन को-ऑप सोसायटी लिमिटेड, शेंदुर्णी संचलित निळकंठ पंढरीनाथ पाटील विद्यालय, पळासखेडे मिराचे येथील इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ व बक्षीस वितरण सोहळा दिनांक 7 फेब्रुवारी 2025 रोजी विद्यालयाच्या प्रांगणात मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या समारंभाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष संजयरावजी गरुड होते. त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून दहावीच्या विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी मोलाचे मार्गदर्शन केले. कार्यक्रमासाठी प्रमुख वक्ते म्हणून सातपुडा ऑटोमोबाईलचे संचालक डी. डी. बच्छाव सर उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांना परीक्षेतील यश आणि भविष्यातील संधी याविषयी प्रेरणादायी मार्गदर्शन केले. संस्थेचे सचिव सागरमलजी जैन यांनी देखील आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांना यशाच्या दिशेने वाटचाल करण्याचे मार्गदर्शन केले. विद्यालयाचे मुख्याध्यापक व्ही. आर. पाटील सर यांनी प्रास्ताविकात शाळेच्या यशस्वी वाटचालीचा आढावा घेतला. कार्यक्रमास ठानसिंग पाटील, दशरथ पाटील, संस्थेचे सहसचिव यू. यू. पाटील, ज्येष्ठ संचालक भीमराव पाटील, स्थानिक सल्लागार समितीचे सदस्य पदम बाबा, जनार्दन पवार, गायके बाबा, चंद्रकांत कुलकर्णी, संजय कुलकर्णी, कैलास साबळे, डी. पी. पाटील सर आदी मान्यवर उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतातून शालेय जीवनातील आठवणींना उजाळा दिला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्यालयाचे पर्यवेक्षक जे. आर. पाटील सर, सर्व शिक्षकवृंद आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन टी. टी. इंगळे सर यांनी केले तर व्ही. डी. पाटील सर यांनी आभारप्रदर्शन करून समारंभाची सांगता झाली.

Read More

रेल्वे अपघातात जवानाचा दुर्दैवी मृत्यू ,मूळ गावी दोंदवाडे (ता. जामनेर, जि. जळगाव) येथे शासकीय इतमामात अंत्यविधी पार पडला

प्रतिनिधी श्रीरामपूर – भारतीय सैन्यदलात कार्यरत असलेले वीर जवान गणर जयवंत दिलीप परदेशी (आर्मी क्रमांक- 21022154X) यांचा रेल्वे अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना 16 जानेवारी 2025 रोजी रात्री 8.00 वाजता घडली. जयवंत परदेशी हे श्रीरामपूर येथे आपल्या आजी-आजोबांच्या भेटीसाठी आले असताना अचानक समोरून येणाऱ्या गाडीची धडक बसल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळाल्यानंतर श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनचे निरीक्षक नितीन देशमुख यांनी घटनास्थळी जाऊन घटनेची नोंद घेतली. जवानाचे पार्थिव शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालय, श्रीरामपूर येथे पाठवण्यात आले. आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर भारतीय सैन्यदलाने त्यांच्या पार्थिवाला सन्मानपूर्वक त्यांच्या कुटुंबीयांकडे सुपूर्द केले. गणर जयवंत दिलीप परदेशी हे कलकत्ता येथे सैन्यदलात कार्यरत होते. सुट्टीसाठी श्रीरामपूर येथे आले असताना रेल्वे अपघातात त्यांच्या डोक्याला गंभीर इजा झाल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. 17 जानेवारी 2025 रोजी सकाळी 7.15 वाजता त्यांच्या मूळ गावी दोंदवाडे (ता. जामनेर, जि. जळगाव) येथे शासकीय इतमामात आणि चालीरीतीनुसार अंत्यविधी पार पडला. त्यानंतर आज 25 जानेवारी 2025 रोजी दशक्रिया विधी कार्यक्रम संपन्न झाला असून तेरवीचा बछडीचा कार्यक्रम मंगळवार, 22 जानेवारी 2025 रोजी होणार आहे. घटनेनंतर नामदार गिरीश महाजन यांच्या पत्नी साधनाताई महाजन यांनी कुटुंबीयांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले आणि कुटुंबाला धीर दिला. वीर जवान जयवंत दिलीप परदेशी हे कुटुंबातील एकमेव कमावते होते. त्यांच्या पश्चात आई-वडील व एक बहीण असा परिवार आहे. त्यांच्या निधनाने गावात शोककळा पसरली असून कुटुंबावर मोठे संकट कोसळले आहे.

Read More
error: Don't Try To Copy !!