जामनेर, ५ मार्च (जे. बी. एन. महाराष्ट्र न्यूज): जळगाव जिल्ह्यातील तलावांचे पुनरुज्जीवन आणि जलस्रोत संवर्धनाच्या उद्देशाने भारतीय जैन संघटना (BJS) आणि जिल्हा प्रशासन यांच्यात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत तलावातील गाळ काढण्यासह गाळयुक्त शिवार, गाळमुक्त बंधारे, नाला खोलीकरण यासारख्या विषयांवर सखोल चर्चा करण्यात आली.
बैठकीला जळगावचे जिल्हाधिकारी मा. आयुष प्रसाद, उपजिल्हाधिकारी श्रीमती अर्चना मोरे, जलसंधारण विभागाचे अधिकारी आणि इतर संबंधित अधिकारी उपस्थित होते. तसेच BJS संघटनेचे राज्य उपाध्यक्ष श्री विनय पारख, जलप्रकल्प जिल्हा प्रमुख सुमीत मुणोत, जळगाव तालुका प्रमुख पंकज जैन, रावेर तालुका प्रमुख देवेंद्र शाह व उज्वल देरेकर, भुसावळ तालुका प्रमुख चेतन जैन, धरणगाव तालुका प्रमुख नीलेश ओस्तवाल, BJS जळगाव अध्यक्ष अजय राखेचा आणि जिल्हा समन्वयक गणेश कोळी यांनीही सहभाग घेतला.
BJS कार्यकर्त्यांनी या बैठकीत शेतकऱ्यांना तलावातील गाळ शेतात नेण्यासाठी जनजागृती करण्याचा संकल्प केला. या मोहिमेच्या प्रचारासाठी १५ तालुक्यांतील BJS पदाधिकारी आणि कार्यकर्ते गावागावात जाऊन शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणार असल्याचे विनय पारख यांनी सांगितले.
यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी प्रत्येक तालुक्यातील तहसीलदार, गटविकास अधिकारी (BDO) आणि सरपंच यांच्यासोबत लवकरच बैठक घेण्याचे निर्देश दिले. तसेच या बैठकीत BJS कार्यकर्त्यांना आमंत्रित करण्याचे आश्वासन दिले.
ही मोहीम यशस्वी झाल्यास जिल्ह्यातील तलाव व जलस्रोतांचे पुनरुज्जीवन होईल आणि शेतकऱ्यांना सुपीक गाळ उपलब्ध होईल, असा विश्वास जिल्हाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.