जामनेर तालुक्यात मंगळवारी दुपारी एक धक्कादायक घटना समोर आली. प्रॉपर्टी डीलर म्हणून ओळख असलेल्या रामेश्वर नथू बिजागरे (वय 40, रा. चिंचखेडा तवा) यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी त्यांनी एका मित्राला फोन करून ही माहिती दिली होती, मात्र मदतीपूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.
प्राप्त माहितीनुसार, रामेश्वर बिजागरे हे लाखोंच्या जमिनीच्या व्यवहारांमुळे जामनेर परिसरात परिचित होते. मंगळवारी सकाळी ते नेहमीप्रमाणे जामनेर-बोदवड रोडवरील भवानी मंदिरात दर्शनासाठी गेले होते. नंतर काही मित्रांसह धाब्यावर जेवणही केले. त्यानंतर त्यांनी एका निकटवर्तीय मित्राला फोन करून “आपण आत्महत्या करत आहे,” असे सांगितले.
संबंधित मित्राने त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला, परंतु काही वेळाने त्यांचा फोन बंद यायला लागला. यानंतर मित्रांनी लोकेशनवरून शोध घेत भवानी घाट परिसर गाठला असता, बिजागरे यांचा मृतदेह झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. याबाबत तात्काळ पोलीस स्टेशनला माहिती देण्यात आली.
पोलीसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला असून मृत्यूपूर्वी लिहिलेली एक चिठ्ठी असल्याची माहिती आहे. प्राथमिक माहितीनुसार, या चिठ्ठीत काही व्यक्तींची नावे नमूद करण्यात आली असून, पैशांचे व्यवहार, देणे-घेणे यांचा उल्लेख असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पोलिसांनी तपास सुरू केला असून, मृत्यूमागील कारणे लवकरच स्पष्ट होण्याची शक्यता आहे.
रामेश्वर बिजागरे यांनी अल्पावधीतच आर्थिक प्रगती केली होती. प्रॉपर्टी डीलिंगच्या माध्यमातून त्यांचे अनेकांशी व्यवहार होते. या व्यवहारांमुळे मानसिक तणाव होता का, याचा तपास पोलीस करत आहेत.
त्यांच्या पश्चात वृद्ध आई-वडील, पत्नी, एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे. या दुर्दैवी घटनेमुळे चिंचखेडा गावात तसेच जामनेर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.