Jalgaon
माळपिंपरी येथील कृषीदुतांनी मधुरम नर्सरीला दिली भेट. नर्सरी व्यवस्थापनाची माहिती घेतली जाणून.
जामनेर (प्रतिनिधी):- डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालय जळगाव येथील अंतिम वर्षातील कृषिदूत सुशांत जाधव, पवन बुवा , संग्राम पवार आणि सौरभ पाटील यांनी प्राचार्य डॉ. शैलेश तायडे आणि कार्यक्रम समन्वयक प्रा. बी. एम गोणशेटवाड , कार्यक्रम अधिकारी प्रो. व्हि.एस.पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मधुरम नर्सरी येथे भेट देऊन गट चर्चा प्रात्यक्षिक राबविले. मधुरम नर्सरीचे संचालक मा.श्री.योगेश पाटील यांनी रोपवाटिका (Nursery) व्यवस्थापन म्हणजे बियाणे, कलमे यांपासून रोपे तयार करणे, त्यांची योग्य निगा राखणे (पाणी, खत, कीटकनाशके), आणि योग्य पद्धतीने विक्री करणे यासाठीचे नियोजन होय. यशस्वी नर्सरीसाठी वनस्पतींची गरज, सिंचन, खत व्यवस्थापन, तापमान नियंत्रण, रोग-कीड नियंत्रण आणि मार्केटिंगचे ज्ञान आवश्यक आहे, ज्यात नियोजनबद्ध काम आणि रोपांविषयीची आवड यांची माहिती जाणून घेतली.
जामनेर तालुक्यातील २० नागरिकांच्या मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया यशस्वी,४ हजारांहून अधिक नागरिकांना मिळाला लाभ
जळगाव : राज्याचे जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली चालणाऱ्या ‘गिरीश महाजन वैद्यकीय सहायता कक्षा’च्या माध्यमातून जामनेर तालुक्यात आरोग्य सेवेचा मोठा यज्ञ सुरू आहे. नुकतेच या अभियानांतर्गत २० रुग्णांच्या मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडल्या. विशेष म्हणजे, या उपक्रमाद्वारे आतापर्यंत ४ हजार पेक्षा अधिक नागरिकांच्या डोळ्यांवर यशस्वी शस्त्रक्रिया करून त्यांना दृष्टीदान देण्यात आले आहे. तज्ज्ञ डॉक्टरांचा सहभागया मोहिमेत तज्ज्ञ डॉक्टरांच्या पथकाने आपली सेवा बजावली. यामध्ये प्रामुख्याने डॉ. प्रवीण पाटील, डॉ. मयूरी राठोड, डॉ. प्रियंका पाटील, डॉ. सोबीया अन्सारी, डॉ. विलास बाविस्कर यांनी रुग्णांवर शस्त्रक्रिया केल्या. टीम वर्क आणि समन्वयशस्त्रक्रिया यशस्वी करण्यासाठी वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी मोठे परिश्रम घेतले. यामध्ये इनचार्ज सिस्टर सुनीता वक्ते, अधिपरिचारक सागर कोळी आणि हिरा पालवी यांचे मोलाचे सहकार्य लाभले. या संपूर्ण अभियानाचे नियोजन आणि अंमलबजावणी ‘गिरीश महाजन वैद्यकीय सहायता कक्षा’चे समन्वयक तथा आरोग्यदूत पै. शिवाजी रामदास पाटील आणि समाजसेविका रुचिता चौधरी यांनी केली. खाजगी रुग्णालयातील शस्त्रक्रियेचा खर्च परवडत नसलेल्या ग्रामीण भागातील गरजू नागरिकांसाठी हे अभियान वरदान ठरत आहे. ‘प्रत्येकाला उत्तम आरोग्य आणि दृष्टी मिळावी’ या ध्येयाने प्रेरित होऊन हे कार्य अविरत सुरू असून, लाभार्थ्यांनी मंत्री गिरीश महाजन आणि त्यांच्या टीमचे मनापासून आभार मानले आहेत.
लेवा पाटीदार महासंघाकडून सौ. पुनम विजय फालक यांचा गौरव म्हणजे आमच्या फालक परिवाराचा अभिमान— ताप्ती एज्युकेशन सोसायटी अध्यक्ष मोहन फालक
भुसावळ –येथील ताप्ती पब्लिक विद्यालयाच्या ऊपशिक्षीका, आदर्श शिक्षिका पुरस्कार तसेच मानाचा शाहु महाराज मानाचा नारी रत्न पुरस्कार प्राप्त व आंतरराष्ट्रीय संस्थेकडून शिक्षा शिरोमणी पुरस्कार प्राप्त सौ.पूनम विजय फालक यांनी केलेल्या कार्याची दखल लेवा पाटीदार महासंघाने घेतली असून त्यांना थोपटे लॉन्स, रहाटणी, पुणे येथे लेवा पाटीदार महासंघातर्फे कर्तृत्ववान महिला हा पुरस्कार पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे ज्येष्ठ नगरसेवक व महानगरपालिकेचे सभागृह नेते तसेच स्मार्ट सिटी प्रोजेक्टचे संचालक,नामदेव दादा ढाके, लेवा पाटीदार महासंघाचे अध्यक्ष अरुण बोरोले, डि.जी.पी डाँ सुहास वारके, गोदावरी फाउंडेशन च्याअध्यक्षा व भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या उपाध्यक्षा डाॅ. केतकी उल्हास पाटील, जळगाव लेवा समाज मंडळ अध्यक्ष , एल एम सी ग्रुप चे अध्यक्ष मिलींद चौधरी, तसेच लेवा पाटीदार महासंघाचे सदस्य विजय फालक ,भंगाळे गोल्ड जळगावच्या संचालिका सुरेखा भंगाळे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत व शुभ हस्ते त्यांना गौरवण्यात आले. या प्रसंगी मोठ्या संखेने समाज बांधव व महिला ऊपस्थित होते.पुरस्कार सोहळ्यानंतर अँड.जयश्री पाचपांडे,दिपक पाचपांडे,समाजसेवी खुशबु फिरके,चंदन फिरके यांचेसह अनेक ऊपस्थीतांनी त्यांचे अभिनंदन केले. सौ.पुनम फालक यांनी पुरस्कारांचा चौकार मारल्याबद्यल कुर्हे पानाचे येथील जयलक्ष्मी अँकेडेमी ने अभिनंदन समारोहचे आयोजन केले होते. कार्यक्रमाची सुरवात प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते गणेश आरतीने झाली.हा पुरस्कार फक्त पुरस्कार नसुन फालक परिवाराचा अभिमान असून सौ. पूनम फालक यांनी घेतलेल्या मेहनतीचे, आदर्शाचे व कार्य तप्तरतेचे, चिकाटीचे,कार्यक्षमतेचे द्योतक आहे. यामुळे परीवाराला,समाजाला प्रेरणा मिळते. मला नमूद करावेसे वाटते की मी अध्यक्ष असलेल्या संस्थेत त्या कार्यरत आहे . त्यांनी शिक्षण क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटला असून यापुढे सुद्धा त्यांनी जिद्दीने, मेहनतीने नवनवीन क्षेत्र पदांक्रांत करून संस्थेचे, विद्यालयाचे व परिवाराचे नाव उज्वल करावे. त्यांनी आजपर्यंत घेतलेल्या मेहनतीचे कष्टाचे प्रयत्नाचे व संसार रुपी भवसागरात ठामपणे उभे राहिलेल्या व आदर्श निर्माण करणाऱ्या आदर्श व्यक्तीचा सत्कार करतांना आम्हाला धन्यता वाटत आहे व यांचाच आम्हाला अभिमान आहे असे संस्थाध्यक्ष मोहन मोरेश्वर फालक यांनी नमुद केले.
करिअरच्या नव्या क्षितिजांकडे प्रेरणादायी वाटचाल-निर्मल इंटरनॅशनल स्कूलमध्ये रोटरी क्लबतर्फे व्याख्यान…!
पाचोरा :रोटरी क्लब पाचोरा-भडगावच्या वतीने “करिअरच्या विविध संधी” या विषयावर प्रेरणादायी व्याख्यानाचे आयोजन निर्मल इंटरनॅशनल स्कूलमध्ये करण्यात आले. समाजहितासाठी नेहमीच उपक्रम राबवणाऱ्या रोटरी क्लबने विद्यार्थ्यांच्या भविष्यास दिशा देणारा हा उपक्रम राबवला.या कार्यक्रमात कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. के. बी. पाटील यांनी विद्यार्थ्यांना करिअरच्या अमर्याद संधींविषयी मोलाचे मार्गदर्शन केले. “प्रामाणिकपणा, सातत्य आणि परिश्रम या तीन मंत्रांनी यशाचे शिखर गाठता येते,” असा प्रेरणादायी संदेश देत त्यांनी विद्यार्थ्यांना आत्मविश्वास आणि ध्येयदर्शन दिले.या प्रसंगी निर्मल इंटरनॅशनल स्कूलच्या अध्यक्षा मा. वैशालीताई सूर्यवंशी, निर्मल सीड्सचे संचालक डॉ. जे. सी. राजपूत, शाळेचे सचिव नरेंद्रसिंग सुर्यवंशी, रोटरी क्लब पाचोरा-भडगावचे अध्यक्ष डॉ. मुकेश तेली, सचिव डॉ. अजयसिंग परदेशी, प्राचार्य गणेश राजपूत, तसेच रोटरी उपप्रांतपाल भरत सिनकर, डॉ. प्रशांत सांगडे, डॉ. सिद्धांत तेली, डॉ. स्वप्नील पाटील, पिंकी जिनोदिया, लक्ष्मण जाधव, शाळेचे जनसंपर्क अधिकारी आय. बी. सिंग, समन्वयिका स्नेहल पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. रोटरी क्लबचे अध्यक्ष डॉ. मुकेश तेली यांनी आपल्या भाषणात सांगितले की,“एकजुटीने आणि सेवाभावाने कार्य केल्यास कोणताही उपक्रम यशस्वी ठरतो; समाजसेवा हीच खरी समाधानाची दिशा आहे.”कार्यक्रमाचे प्रस्ताविक आणि आभारप्रदर्शन शाळेच्या समन्वयिका स्नेहल पाटील यांनी केले.करिअरविषयक मार्गदर्शनाने विद्यार्थ्यांच्या मनात नव्या उमेद, नवे विचार आणि उज्ज्वल भविष्याचे स्वप्न उजळून निघाले.
प्रत्येक निवडणुकीत एकाच घरातील सदस्यांना उमेदवारी का?
जे बी एन महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी जब्बार एस तडवी जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर फरदापुर गणात राजकीय पक्षांकडून पुन्हा एकदा एकाच घरातील सदस्यांना उमेदवारी तिकीट दिल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व रोष उफाळून येताना व्यक्त होत आहे. प्रत्येक निवडणुकीत त्याच कुटुंबातील व्यक्तींनाच संधी दिली जात असल्याने सामान्य कार्यकर्ते व नव्या तरुण उमेदवारांवर अन्याय होत असल्याची भावना जनतेतून पुढे येत आहे.“पक्षासाठी वर्षानुवर्षे काम करणाऱ्या कार्यकर्तांना डावलून घराणेशाहीला प्राधान्य दिले जाते,” अशी टीका स्थानिक नागरिक व कार्यकर्त्यांकडून केली जात आहे. यामुळे लोकशाही मूल्यांना तडा जात असून पक्षांची विश्वासार्हता कमी होत आहे, त्यातच रस्ते, पाणी,आरोग्य, व शिक्षण यांसारख्या मूलभूत सुविधांमध्ये अपेक्षित सुधारणा झालेली नाही निवडणूक आली की आश्वासनाचा पाऊस आणि नंतर मात्र शांतता असा अनुभव जनतेने वारंवार घेतला आहे यावेळी मात्र जनतेचा सूर बदललेला दिसत आहे घराणे नाही काम पाहिजे अशी स्पष्ट भूमिका फरदापुर गणात परिवर्तनाची लाट निर्माण होत असल्याचे चित्र स्पष्टपणे दिसत आहे असेही मत व्यक्त होत आहे.तरुण व सक्षम उमेदवारांना संधी न देता वारंवार एकाच घरातील सदस्यांना तिकीट दिल्यास निवडणुकीत याचा फटका पक्षांना बसू शकतो, असा इशाराही नागरिकांनी दिला आहे. याबाबत राजकीय पक्षांनी आत्मपरीक्षण करून न्याय्य व पारदर्शक उमेदवार निवड प्रक्रिया राबवावी, अशी मागणी जनतेतून होत आहे.
राज्य निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद;
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या तारखा जाहीर राज्य निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद; जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या तारखा जाहीर मुंबई (प्रतिनिधी):राज्य निवडणूक आयोगाच्या वतीने आज आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत राज्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या तारखांची अधिकृत घोषणा करण्यात आली. या घोषणेमुळे राज्यातील राजकीय वातावरण तापण्याची चिन्हे दिसू लागली असून प्रशासकीय तयारीलाही वेग आला आहे. राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार १६ जानेवारी २०२६ रोजी निवडणूक प्रक्रिया जाहीर होणार असून त्याच दिवसापासून आदर्श आचारसंहिता लागू होणार आहे. नामनिर्देशन अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया १६ ते २१ जानेवारीदरम्यान पार पडणार आहे. अर्जांची छाननी २२ जानेवारी रोजी केली जाणार आहे. उमेदवारांना २७ जानेवारी २०२६ रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत अर्ज माघारी घेता येणार असून त्यानंतर दुपारी ३.३० नंतर निवडणूक चिन्हांचे वाटप करण्यात येणार आहे. या निवडणुकीसाठी ५ फेब्रुवारी २०२६ रोजी मतदान होणार असून ७ फेब्रुवारी २०२६ रोजी मतमोजणी करून निकाल जाहीर केला जाणार असल्याची माहिती आयोगाने दिली. दरम्यान, निवडणुका शांततेत व पारदर्शक वातावरणात पार पडाव्यात यासाठी सर्व प्रशासकीय यंत्रणांना सज्ज राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या निवडणुकांकडे राज्यातील राजकीय पक्षांचे लक्ष लागले असून येत्या काही दिवसांत प्रचाराला वेग येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
व्यसन हे युवकांच्या स्वप्नांचे आणि देशाच्या भविष्याचे सर्वात मोठे शत्रू – मा. न्यायाधीश अतीश खोल्लम
बोदवड | प्रतिनिधी“आजचा युवक हा उद्याच्या भारताचा शिल्पकार आहे. मात्र तोच युवक अमली पदार्थांच्या विळख्यात सापडला तर केवळ त्याचेच नव्हे, तर संपूर्ण देशाचे भवितव्य अंधारात जाईल. व्यसन हे युवकांच्या स्वप्नांचे, कुटुंबाच्या सुखाचे आणि देशाच्या प्रगतीचे सर्वात मोठे शत्रू आहे,” असे परखड मत बोदवड न्यायालयाचे माननीय न्यायाधीश अतीश खोल्लम यांनी व्यक्त केले.राष्ट्रीय युवा दिनानिमित्त कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, बोदवड येथील राष्ट्रीय सेवा योजना (एन.एस.एस.) एककाच्या विशेष हिवाळी शिबिराअंतर्गत आयोजित “समर्थ युवक, समर्थ भारत” मॅरेथॉन व “अमली पदार्थ मुक्त भारत – अमली पदार्थ मुक्त तरुण” या विषयावरील व्याख्यान कार्यक्रमात ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते.न्यायाधीश खोल्लम म्हणाले की, अमली पदार्थांचे सेवन सुरुवातीला मौज-मजेसाठी सुरू होते, मात्र पुढे त्याचे रूप गंभीर व्यसनात बदलते आणि शेवटी गुन्हेगारीकडे वाटचाल होते. न्यायालयात येणाऱ्या अनेक गुन्ह्यांची मुळे ही व्यसनाधीन तरुणांशी जोडलेली असतात. चोरी, मारहाण, फसवणूक यांसह गंभीर गुन्ह्यांमागे व्यसन हे प्रमुख कारण असल्याचे वास्तव त्यांनी अधोरेखित केले.कायद्याच्या दृष्टीने मार्गदर्शन करताना त्यांनी एन.डी.पी.एस. कायद्यानुसार अमली पदार्थांशी संबंधित गुन्ह्यांना अत्यंत कठोर शिक्षा, मोठा दंड व दीर्घकालीन कारावासाची तरतूद असल्याचे स्पष्ट केले. क्षणिक आकर्षण किंवा चुकीची संगत आयुष्य उद्ध्वस्त करू शकते, त्यामुळे युवकांनी सदैव व्यसनांपासून दूर राहावे, असा ठाम संदेश त्यांनी दिला.कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते बोदवड वकील संघाचे अध्यक्ष अॅड. अर्जुन पाटील यांनी अमली पदार्थांचे मानसिक, शारीरिक व कौटुंबिक दुष्परिणाम स्पष्ट करत युवकांनी चुकीच्या संगतीपासून दूर राहण्याचे आवाहन केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक एन.एस.एस. कार्यक्रमाधिकारी प्रा. नितेश सावदेकर यांनी केले. त्यांनी स्वामी विवेकानंदांच्या विचारांनुसार युवक हा परिवर्तनाचा प्रमुख घटक असल्याचे सांगत एन.एस.एस. ही समाजबदलाची चळवळ असल्याचे नमूद केले.यावेळी आयोजित मॅरेथॉन स्पर्धेत २३२ स्वयंसेवक व शालेय विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. मुलांच्या गटातून रिहान शेख प्रथम, विनायक भावसार द्वितीय तर जयदीप सरोदे तृतीय क्रमांकाचे मानकरी ठरले. मुलींच्या गटातून कु. आयेशा निजाम मुलतानी प्रथम, त्रिवेंद्र वाघ द्वितीय तर कु. लीना सांगवे यांनी तृतीय क्रमांक पटकावला.कार्यक्रमाच्या आयोजनासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरविंद चौधरी यांनी मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन प्रा. शरद पाटील, तर आभार प्रदर्शन कु. उपासना पाटील यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. कंचन दमाडे, प्रा. अजित पाटील, प्रा. ज्ञानेश्वर तिवारी, प्रा. तुषार सोनवणे व सर्व स्वयंसेवकांनी परिश्रम घेतले.
जिल्हा परिषद निवडणुकीसाठी मुदतवाढ, सुप्रीम कोर्टाने थेट तारीख सांगत दिले आदेश!
नवी दिल्ली : जिल्हा परिषदांच्या निवडणुकीबाबत सर्वोच्च न्यायालयाने मोठा निर्णय दिलाय. याआधी ३० जानेवारीपर्यंत निवडणूक घेण्याचे आदेश दिले होते. त्यात आता मुदतवाढ देण्यात आलीय. आता १५ फेब्रुवारीपर्यंत निवडणूक घेण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने दिलेत. यामुळे लवकरच जिल्हा परिषदेच्या निवडणुका जाहीर होण्याची शक्यता असून आचारसंहिता लागू होऊ शकते. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या संदर्भात दाखल जालेल्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी पार पडली. राज्य निवडणूक आयोगाकडून जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी मदुतवाढ मिळावी अशी मागणी करणारी याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सोमवारी सुनावणी पार पडली. सर्वोच्च न्यायालयाने राज्य निवडणूक आयोगाची मागणी मान्य करत मुदतवाढ दिली आहे. याआधी ३१ जानेवारीपर्यंत निवडणूक घेण्याचे आदेश दिले होते. मात्र आता १५ फेब्रुवारीपर्यंत जिल्हा परिषद निवडणूक घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. यामुळे राज्य निवडणूक आयोगाला मोठा दिलासा मिळाला आहे. राज्यातील १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुकीला सुप्रीम कोर्टानं दोन आठवड्यांची मुदतवाढ दिलीय. तर इतर सर्व जिल्हा परिषदांच्या निवडणुकीसंदर्भात २१ तारखेला पुन्हा सुनावणी होणार आहे. निवडणूक आयोगाकडून १० फेब्रुवारी पर्यंत सर्व निवडणुका पार पाडू असा अर्ज कोर्टात करण्यात आला होता. दरम्यान, जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाकडून तयारी करण्यात आली आहे. निवडणूक आयोगाकडून राज्यातील जिल्हाधिकाऱ्यांना पूर्वतयारीच्या सूचना करण्यात आल्या आहेत. ५० टक्क्यांपेक्षा कमी आरक्षण असलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितींना निवडणूक वेळेत घेण्यासाठी आदेश दिले आहेत. याबाबत निवडणूक आयोगाकडून जिल्हाधिकाऱ्यांना पत्रही पाठवण्यात आलंय.
डॉ . बाबासाहेबांच्या रंगकामावर तीव्र नाराजी; आरपीआयचे मुख्याधिकाऱ्यांना निवेदन, आंदोलनाचा इशारा
जे. बी. एन महाराष्ट्र न्यूज जामनेरप्रतिनिधी-सुपडू जाधवडॉ. बाबासाहेबांच्या पुतळ्याच्या रंगकामावर तीव्र नाराजी; आरपीआयचे मुख्याधिकाऱ्यांना निवेदन, आंदोलनाचा इशाराजामनेर शहरातील पोलीस स्टेशन समोर असलेल्या विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या रंगकामामुळे बाबासाहेबांच्या सन्मानाला धक्का पोहोचल्याची भावना व्यक्त होत असून या प्रकाराबाबत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आरपीआय)च्या वतीने तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. यासंदर्भात आज आरपीआयच्या वतीने जामनेर नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना अधिकृत निवेदन सादर करण्यात आले.निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, पुतळ्याला करण्यात आलेले रंगकाम हे बाबासाहेबांच्या तेजस्वी व प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वाशी सुसंगत नसून त्यामुळे पुतळ्याचे विद्रूपीकरण झाल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे. त्यामुळे पूर्वीप्रमाणे बाबासाहेबांच्या पुतळ्याला सोनेरी (गोल्डन) रंग देऊन योग्य प्रकारे सुशोभीकरण करण्यात यावे तसेच दोन दिवसांच्या आत पुतळ्याची संपूर्ण स्वच्छता करण्यात यावी, अशी ठाम मागणी आरपीआयने केली आहे.प्रशासनाने या मागणीची तात्काळ दखल न घेतल्यास बाबासाहेबांच्या सन्मानासाठी आणि अनुयायांच्या भावना लक्षात घेता आरपीआयच्या वतीने शेकडो कार्यकर्त्यांसह तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा स्पष्ट इशारा आरपीआयचे नेते भगवान सोनवणे यांनी दिला आहे.डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे सामाजिक न्याय, समता आणि संविधानाचे शिल्पकार असल्याने त्यांच्या पुतळ्याबाबत कोणतीही निष्काळजीपणा सहन केला जाणार नाही, अशी भूमिका आरपीआयच्या वतीने यावेळी ठामपणे मांडण्यात आली. प्रशासनाने त्वरित योग्य निर्णय घेऊन बाबासाहेबांच्या पुतळ्याचे सन्मानपूर्वक सुशोभीकरण करावे, अशी जोरदार मागणी नागरिकांतूनही होत आहे.
खान्देशचा झेंडा थेट ‘बिगबॉस मराठी ६’ मध्ये; शेंदुर्णीचा अहिराणी सुपरस्टार सचिन कुमावत यांची ऐतिहासिक एन्ट्री
शेंदुर्णी (ता. जामनेर | जि. जळगाव) –कलर्स मराठीवरील बहुचर्चित रिअॅलिटी शो ‘बिगबॉस मराठी – सिझन ६’ मध्ये खान्देशच्या मातीतून घडलेल्या एका कलाकाराने थेट महाराष्ट्राच्या सर्वात मोठ्या मनोरंजन मंचावर झेप घेत इतिहास रचला आहे. अहिराणी भाषेला राज्यभर ओळख मिळवून देणारे खान्देशचा आवाज – सचिन विठ्ठल कुमावत यांनी काल (११ जानेवारी) भव्य उद्घाटन सोहळ्यात बिगबॉसच्या घरात प्रवेश करत संपूर्ण खान्देशचा अभिमान वाढवला.अभिनेता रितेश देशमुख यांच्या होस्टिंगमध्ये सुरू झालेल्या या सिझनच्या पहिल्याच दिवशी सचिन कुमावत यांच्या दमदार आणि आत्मविश्वासपूर्ण एन्ट्रीने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले. ग्रामीण भागातून आलेला कलाकार अहिराणी भाषेचा अभिमान जपत मंचावर उभा राहिल्याने सोशल मीडियावरही त्यांच्या एन्ट्रीची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. प्रतिपंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शेंदुर्णीसारख्या ग्रामीण भागातून कोणतेही राजकीय किंवा कौटुंबिक पाठबळ नसताना स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण करणारे सचिन कुमावत आजही आपल्या गावाशी, मित्रपरिवाराशी घट्ट नाळ जपून आहेत. साधेपणा आणि मातीशी नातं टिकवून ठेवणं हीच त्यांची ओळख आहे.सन २००५ मध्ये ‘आरं दाजीबा’ या पहिल्या अल्बमपासून संगीत प्रवासाला सुरुवात करणाऱ्या सचिन कुमावत यांनी गेल्या दोन दशकांत खान्देशी लोककलेला आधुनिक व्यासपीठावर नेले. ‘केसांवर फुगे’, ‘लगनमा मचाडू धूम’, ‘सावन महिना मा’, ‘पोरी तुना गजरा’, ‘वाडी वाडी चंदन वाडी’, ‘टमटम’, ‘मनी डार्लिंग’, ‘मामी तुमची मुलगी लय सुंदर’, ‘खान्देशनी जत्रा’ यांसारखी असंख्य गाणी सुपरहिट ठरली आहेत.विशेष म्हणजे ‘केसांवर फुगे’ या गाण्याने यूट्यूबवर २८७ मिलियनहून अधिक व्ह्यूज मिळवत अहिराणी–मराठी संगीत क्षेत्रात नवा इतिहास रचला. आज त्यांच्या यूट्यूब चॅनेलला एकूण १.२ बिलियनहून अधिक (१२० कोटींपेक्षा जास्त) व्ह्यूज मिळाले असून, ग्रामीण भागातून एवढे मोठे डिजिटल यश मिळवणारा ते पहिले खान्देशी कलाकार ठरले आहेत.आतापर्यंत २५० पेक्षा अधिक लाईव्ह स्टेज शो, ५०० हून अधिक खान्देशी-अहिराणी व्हिडीओ अल्बम, तसेच Music Marathi, 9X Marathi, मायबोली यांसारख्या वाहिन्यांवर सातत्याने सादरीकरण असा त्यांचा कलात्मक प्रवास थेट बिगबॉसच्या घरापर्यंत पोहोचला आहे. याशिवाय लवकरच प्रदर्शित होणारा “ज्याची करावी कीव तोच घेतो जीव” हा त्यांचा आगामी चित्रपटही प्रेक्षकांच्या प्रतीक्षेत आहे.खान्देश भूषण, गिरणा गौरव, गोदा सन्मान, महाराष्ट्राचा Reel Star Award यांसारख्या अनेक मानाच्या पुरस्कारांनी सन्मानित झालेल्या सचिन कुमावत यांच्या कारकिर्दीत बिगबॉस मराठी हे आणखी एक सुवर्णपान जोडले गेले आहे.सचिन कुमावत यांची ही एन्ट्री केवळ एका कलाकाराचे यश नसून, संपूर्ण खान्देश आणि ग्रामीण महाराष्ट्राच्या प्रतिभेचा विजय असल्याची भावना सर्वत्र व्यक्त होत आहे.
