Maharashtra
कन्नड–चाळीसगाव घाटात ST बसचा भीषण अपघात; स्टीयरिंग रॉड तुटल्याने बस दरीच्या काठावर अडकली, मोठी जीवितहानी टळली
छत्रपती संभाजीनगर | 23 ऑगस्ट 2026 छत्रपती संभाजीनगरहून सुरतकडे जाणाऱ्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (MSRTC/ST) बसचा रविवारी, 23 ऑगस्ट रोजी कन्नड–चाळीसगाव औट्रम घाटात भीषण अपघात झाला. बसचा स्टीयरिंग रॉड अचानक तुटल्याने चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि बस रस्त्याच्या कडेला असलेल्या सुरक्षा कठड्याला धडकली. धडकेनंतर बस दरीच्या अगदी काठावर जाऊन अडकली. सुदैवाने बस दरीत कोसळली नाही आणि मोठी जीवितहानी टळली. मिळालेल्या माहितीनुसार, अपघातग्रस्त बसचा क्रमांक MH-40-N-9726 असून या बसमधून सुमारे 59 प्रवासी प्रवास करत होते. घाटातील धोकादायक वळणावर बसचा स्टीयरिंग रॉड तुटल्याने काही क्षणांतच परिस्थिती गंभीर बनली. चालकाने प्रसंगावधान राखत बस नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र बस सुरक्षा कठड्याला धडकल्याने बस दरीच्या काठावर अडकून राहिली. थरारक प्रसंग; काही क्षणांत प्रवाशांच्या जीवावर बेतले अपघाताच्या वेळी बसमध्ये मोठ्या संख्येने प्रवासी असल्याने काही क्षणांसाठी घटनास्थळी भीतीचे वातावरण निर्माण झाले. बस दरीच्या दिशेने झुकल्याने प्रवाशांमध्ये एकच गोंधळ उडाला. मात्र बस दरीत न कोसळल्याने मोठी दुर्घटना टळली. प्राथमिक माहितीनुसार, या अपघातात सुमारे 4 ते 5 प्रवासी जखमी झाले असल्याचे सांगण्यात येत आहे. जखमींना तातडीने वैद्यकीय उपचारासाठी हलविण्यात आले. सुदैवाने या दुर्घटनेत मोठी जीवितहानी झाल्याची माहिती नाही. स्टीयरिंग रॉड तुटल्याने अपघात? प्राथमिक माहितीनुसार बसचा स्टीयरिंग रॉड तुटणे हे अपघाताचे प्रमुख कारण असल्याचे सांगितले जात आहे. मात्र अपघाताचे नेमके कारण अधिकृत तपासानंतरच स्पष्ट होणार आहे. बसची तांत्रिक स्थिती, स्टीयरिंग यंत्रणेची तपासणी तसेच बसच्या देखभालीबाबतही संबंधित यंत्रणांकडून तपास केला जाण्याची शक्यता आहे. कन्नड–चाळीसगाव घाट पुन्हा चर्चेत कन्नड–चाळीसगाव औट्रम घाट हा या भागातील महत्त्वाचा मात्र धोकादायक घाटमार्ग म्हणून ओळखला जातो. या घाटात तीव्र वळणे, उतार आणि दरीचा भाग असल्याने वाहनचालकांना मोठ्या सावधगिरीने वाहन चालवावे लागते. यापूर्वीही या घाटात विविध वाहनांचे अपघात झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. यापूर्वीच्या वृत्तांमध्ये घाटातील सुरक्षा कठडे, रस्त्याची स्थिती आणि सुरक्षाव्यवस्थेबाबतही प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. त्यामुळे या ताज्या अपघातानंतर घाटातील सुरक्षा व्यवस्था आणि वाहनांची तांत्रिक तपासणी याकडे पुन्हा लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे. मोठी दुर्घटना टळल्याने सुटकेचा निश्वास बस दरीत कोसळली असती तर परिस्थिती अत्यंत गंभीर झाली असती. मात्र बस सुरक्षा कठड्याला धडकल्यानंतर दरीच्या काठावरच अडकल्याने मोठा अनर्थ टळला. बसमधील सुमारे 59 प्रवाशांचे जीव धोक्यात आले असतानाही मोठी जीवितहानी न झाल्याने प्रवाशांनी आणि त्यांच्या नातेवाईकांनी सुटकेचा निश्वास सोडला. या घटनेनंतर ST बसच्या तांत्रिक तपासणीचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला असून, घाटमार्गावर धावणाऱ्या बस आणि इतर वाहनांची नियमित तपासणी काटेकोरपणे करावी, अशी मागणी होण्याची शक्यता आहे. बस क्रमांक : MH-40-N-9726मार्ग : छत्रपती संभाजीनगर – सुरतघटनास्थळ : कन्नड–चाळीसगाव औट्रम घाटप्रवासी : सुमारे 59जखमी : प्राथमिक माहितीनुसार 4 ते 5अपघाताचे प्राथमिक कारण : स्टीयरिंग रॉड तुटल्याने बसवरील नियंत्रण सुटलेजीवितहानी : मोठी जीवितहानी टळली
जामनेरच्या ईश्वर चौधरींना ‘दादासाहेब फाळके 2026 बेस्ट अॅक्टर’ पुरस्कार
पिंपरी-चिंचवड : जामनेरसारख्या ग्रामीण भागातून अभिनय क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी गेल्या तीन वर्षांपासून सातत्याने संघर्ष करणारे अभिनेता ईश्वर चौधरी यांना यंदाचा ‘दादासाहेब फाळके 2026 बेस्ट अॅक्टर अवॉर्ड’ प्रदान करण्यात आला. पिंपरी-चिंचवड येथील आचार्य अत्रे सभागृहात, डी.वाय. पाटील हॉस्पिटलजवळ आयोजित भव्य पुरस्कार सोहळ्यात त्यांचा गौरव करण्यात आला. ईश्वर चौधरी यांनी गेल्या तीन वर्षांपासून अभिनय क्षेत्रात काम करताना अनेक अडचणींचा सामना केला. अभिनयाची संधी मिळवण्यासाठी त्यांनी अनेक वेळा मुंबई आणि पुणे गाठले. छोट्या गावातून आलेल्या या कलाकाराने आपल्या मेहनतीच्या आणि जिद्दीच्या जोरावर मनोरंजन क्षेत्रात आपले स्थान निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू ठेवला. ईश्वर चौधरी यांनी ‘जब्या’, ‘अपहरण’ यांसारख्या शॉर्ट फिल्ममध्ये प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. तसेच झी मराठीवरील ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ या मालिकेत त्यांनी गुंडाची भूमिका साकारून आपल्या अभिनयाची छाप पाडली. याशिवाय खान्देशी चित्रपट ‘गुल्हेर’ आणि ‘गुल्हेर-2’ मध्ये त्यांनी प्रमुख नायकाची भूमिका साकारली आहे. या प्रवासात अनेकदा मुंबई-पुण्याच्या फेऱ्या माराव्या लागल्या. मात्र, परिस्थिती कितीही कठीण असली तरी अभिनय क्षेत्रात काहीतरी करून दाखवण्याची जिद्द त्यांनी सोडली नाही. अखेर त्यांच्या या मेहनतीला ‘बेस्ट अॅक्टर’ पुरस्काराच्या रूपाने मोठी दाद मिळाली. या पुरस्कार सोहळ्याला अभिनेत्री मृणाल कुलकर्णी, अभिनेत्री नेहा थोरात, रिल स्टार तसेच बिग बॉस फेम प्रभू शेळके यांच्यासह मनोरंजन क्षेत्रातील अनेक मान्यवरांची उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे आयोजन स्वराज फिल्म प्रोडक्शनचे अध्यक्ष श्री. गिरी एस. राज सर यांनी केले होते. जामनेरसारख्या छोट्या ग्रामीण गावातून सुरू झालेला ईश्वर चौधरी यांचा अभिनयाचा प्रवास आता मोठ्या पडद्यापर्यंत पोहोचला असून, ‘दादासाहेब फाळके 2026 बेस्ट अॅक्टर’ पुरस्काराने त्यांच्या तीन वर्षांच्या मेहनतीला नवी ओळख मिळाली आहे. ग्रामीण भागातील कलाकारांसाठी त्यांचा हा प्रवास निश्चितच प्रेरणादायी ठरत आहे.
वाकडी येथे बसस्थानक परिसरासह अवैध धंदे दारुचा व सट्टाचा महापूर
वाकडी.ता.जामनेर.दि.२१ /०८/२६ वाकडी बसस्थानक सह परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून अवैध दारुचा महापूर सुरू असून यात अनेकांचे संसार उद्धवस्त झाले,बसस्थानक परिसरात खुले आम अवैधधंदे बोकाळाले असतांनाही याबाबत काही दिवस दारु बंद झाली होती परंतु विक्रेत्यांवर पोलीसांकडून कुठलेही कार्यवाही होत नसल्याने गावातील नागरिक ञस्त झाले आहे, महिला वर्ग शालेय विध्यार्थी हैराण झाले आहे गावात गेल्या अनेक दिवसांपासून गावांच्या चारही बाजूंनी अवैध दारुची खुलेआम विक्री होत असून यात अनेक जवान तरुण व्यसनाच्या आहारी गेले आहे , मुली-बाळीचे संसार उद्धवस्त होत आहे, बराच मुली विधवा झाल्या आहेत, त्याचे संसार उघड्यावर पडले आहे नवीन निवडुन आलेल्या सरपंच व सभासदांना च्या वतीने गावातील दारू बंद व्हावी यासाठी पहूर पोलिस ठाणे येथे यांनी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून लेखी ठराव दिला, काही वेळा पुरती वाकडी येथील दारुवाल्याचे धाबे दणाणले होते, परंतु पुन्हा देशी दारूचा महापूर बसस्थानक परिसरात चालू आहे,त्याच्यावर कोण्याच्याही लगाम नाही, किंवा दचक नाही, बसस्थानक परिसरात देशी, इंग्लिश,गावठी, दारूचा महापूर चालू आहे, दारू विक्रेत्यांवर पोलीसांच्या वचक दिसून येत नाही असे गावकरी मधून चर्चा करताना दिसत आहेत ,अवैध दारू विक्रेत्यांनी धुमाकूळ घातला आहे त्यावर वरिष्ठ स्तरांवर जाऊन कार्यवाही व्हावी अशी मागणी गावकरी करीत आहेत.
भुसावळमध्ये 30 हजारांची लाच घेताना सहकार विभागातील अधिकारी व दोन लेखापरीक्षक एसीबीच्या जाळ्यात
जळगाव, दि. 15 जून : भुसावळ येथील सहायक निबंधक, सहकारी संस्था कार्यालयाशी संबंधित एका प्रकरणात सहकार अधिकारी व दोन लेखापरीक्षकांना 30 हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहात पकडले. ही कारवाई सोमवारी भुसावळ शहरात करण्यात आली. एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदाराला सावकारी व्यवसायासाठी आवश्यक परवाना काढायचा होता. त्यासाठी संबंधित कार्यालयात अर्ज केल्यानंतर परवाना मंजूर करून देण्यासाठी सहकार अधिकारी विजय विनायक गारूड (वर्ग-3) यांनी 20 हजार रुपयांची लाच मागितल्याचा आरोप आहे. याबाबत तक्रारदाराने एसीबीकडे तक्रार दाखल केली होती.तक्रारीची पडताळणी केल्यानंतर एसीबीने सापळा रचला. तपासादरम्यान सुरेश जनार्दन विसपुते आणि हेमंत प्रकाश काळे या प्रमाणित लेखापरीक्षकांनी संबंधित अधिकाऱ्यांसाठी व स्वतःसाठी मिळून 30 हजार रुपयांची लाच मागितल्याचे निष्पन्न झाले.सोमवारी भुसावळ शहरातील नाहाटा चौफुली परिसरात सापळा कारवाईदरम्यान सुरेश विसपुते यांनी तक्रारदाराकडून 30 हजार रुपयांची लाच स्वीकारली. त्यानंतर एसीबीने त्यांना ताब्यात घेतले. या प्रकरणी विजय गारूड, सुरेश विसपुते आणि हेमंत काळे यांच्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा 1988 अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक हेमंत नागरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पुढील तपास एसीबीकडून सुरू आहे.
मा. ना. श्री. गिरीशभाऊ महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत भव्य रोगनिदान व शस्त्रक्रिया शिबिर
जामनेर :(प्रतिनिधी) जामनेर तालुक्याचे भाग्यविधाता म्हणून ओळखले जाणारे मा. ना. श्री. गिरीशभाऊ महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त कमल फाउंडेशन, जामनेर यांच्या वतीने भव्य मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर रविवार दि. 17 मे 2026 रोजी सकाळी 10 ते दुपारी 3 वाजेपर्यंत एकलव्य माध्यमिक विद्यालय, छत्रपती शिवाजी महाराज नगर, जळगाव रोड, जामनेर येथे पार पडणार आहे.या शिबिरात विविध आजारांवरील तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासणी व मार्गदर्शन करण्यात येणार आहे. कॅन्सर, हृदयरोग, हाडांचे विकार, मूत्ररोग, न्यूरोसर्जरी, जनरल सर्जरी, बालरोग, स्त्रीरोग, नेत्र तपासणी आदी विभागातील नामांकित तज्ज्ञ डॉक्टर नागरिकांची तपासणी करणार आहेत.शिबिरात डॉ. निलेश चांडक, डॉ. प्रितेश कोठारी, डॉ. मनोज पाटील, डॉ. मनोज टोके, डॉ. टी. पी. महाजन, डॉ. सचिन साठे, डॉ. भूषण पाटील, डॉ. निखिल पाटील, डॉ. रविंद्र सुखक्कर, डॉ. अभिनव नाईक, डॉ. मृण्णा सोमाणी, डॉ. सौरभ पाटील, डॉ. सतीष चौधरी, डॉ. नेहा काबरा, डॉ. गिरधारी जेधे तसेच डॉ. पांडुरंग अल्टाट यांसारखे तज्ज्ञ डॉक्टर उपस्थित राहणार आहेत.शिबिरासाठी येताना नागरिकांनी आपले जुने वैद्यकीय रिपोर्ट सोबत आणावेत, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.या उपक्रमास कमल हॉस्पिटल व मॅटर्निटी होम, जामनेर यांचे सहकार्य लाभले असून भारतीय जनता पार्टी, जामनेर यांचे विशेष सहकार्य आहे. आयोजनाची जबाबदारी कमल फाउंडेशन, जामनेर यांनी स्वीकारली आहे.
निळकंठ पंढरीनाथ पाटील विद्यालयात गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार एस.एस.सी परीक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा उत्साहात संपन्न
पळसखेडे मिराचे, प्रतिनिधी : धी. शेंदुर्णी सेकंडरी एज्युकेशन सोसायटी, शेंदुर्णी संचलित निळकंठ पंढरीनाथ पाटील विद्यालय, पळसखेडे मिराचे येथे फेब्रुवारी 2026 मध्ये झालेल्या एसएससी परीक्षेत सेमी व मराठी माध्यमातून प्रथम पाच क्रमांक प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा आज दि. 9 मे रोजी उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमास विद्यालयाचे मुख्याध्यापक आदरणीय श्री व्ही. आर. पाटील सर प्रमुख उपस्थित होते. तसेच इयत्ता दहावीचे वर्गशिक्षक श्री व्ही. डी. पाटील सर, श्री जी. पी. पाटील सर, श्री पी. के. राजपूत सर, श्री व्ही. ए. पाटील सर, सीनियर क्लार्क श्री के. आर. सोनवणे भाऊसाहेब तसेच ग्रंथपाल श्री डी. एस. बोरसे सर यांची उपस्थिती लाभली. कार्यक्रमाला गुणवंत विद्यार्थी व त्यांच्या पालकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शविली. यावेळी विद्यालयाच्या वतीने विद्यार्थ्यांचा व पालकांचा सत्कार करण्यात आला. प्रसंगी मुख्याध्यापक आदरणीय नानासाहेब यांनी विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा देत यशाची परंपरा कायम राखण्यासाठी मेहनत, सातत्य व शिस्त यांचे महत्त्व अधोरेखित केले. त्यांच्या मार्गदर्शनामुळे उपस्थित विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळाली. कार्यक्रमाचे वातावरण उत्साहपूर्ण व प्रेरणादायी होते.
जिकरा न्यू उर्दू विद्यालयाचा दहावीला 98.40 टक्के निकालकु. मिसबाह शेख विद्यालयात प्रथम; यशाबद्दल सर्वत्र कौतुक
जामनेर, प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे यांच्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेच्या निकालात जिकरा एज्युकेशन सोसायटी संचलित जिकरा न्यू उर्दू माध्यमिक विद्यालय, जामनेर येथील विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे. विद्यालयाचा एकूण निकाल 98.40 टक्के लागल्याने विद्यार्थी, पालक व शिक्षकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. या परीक्षेत कु. मिसबाह आसिफ शेख हिने 84.80 टक्के गुण मिळवत विद्यालयात प्रथम क्रमांक पटकाविला. कु. अहेनिश नईम खान हिने 83.40 टक्के गुणांसह द्वितीय क्रमांक मिळविला, तर मोहम्मद अकदस निसार अहमद यांनी 83.20 टक्के गुण प्राप्त करून तृतीय क्रमांक संपादन केला. विद्यार्थ्यांच्या या घवघवीत यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष रहीम शेख तसेच सचिव जाकीर शेख यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या. विद्यालयाचे प्राचार्य इरशाद खान सर व शिक्षकवृंद यांनी विद्यार्थ्यांना सातत्यपूर्ण मार्गदर्शन करून त्यांच्या यशात मोलाचा वाटा उचलला. तसेच संस्थेच्या वतीने सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला असून परिसरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
गरुड विद्यालयाची एसएससी परीक्षेत गरुड झेपशेंदुर्णी ता.जामनेर प्रतिनिधीविद्यालयाची गौरी शिनकर तालुक्यातून द्वितीय,सेमी विभागाचे प्रथम पाच विद्यार्थी शेंदुर्णी केंद्रातून प्रथम
शेंदुर्णी, प्रतिनिधी : धी. शेंदुर्णी से. एज्युकेशन को-ऑप. सोसायटी संचलित आ.ग.र. गरुड माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालय, शेंदुर्णी येथील एसएससी परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून विद्यालयाने 94.90 टक्के इतका उल्लेखनीय निकाल मिळविला आहे. विशेष म्हणजे सेमी इंग्रजी माध्यमाचा निकाल शंभर टक्के लागला आहे. विद्यालयातून एकूण 471 विद्यार्थी परीक्षेस बसले होते. त्यापैकी 447 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. परीक्षेत 201 विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्य संपादन केले असून 34 विद्यार्थ्यांनी 90 टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळविले आहेत. सेमी माध्यमातून कु. गौरी गोपाल शिनकर हिने 97 टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकाविला. कु. मानसी अमोल पाटील व कु. गौरी संजय आगे यांनी प्रत्येकी 96.40 टक्के गुणांसह द्वितीय क्रमांक मिळविला. कु. स्नेहल दगडू घनघाव हिने 96 टक्के गुणांसह तृतीय, कु. वैष्णवी मोहन पाटील हिने 95.60 टक्के गुणांसह चतुर्थ तर चि. दर्शन मनोज कापुरे याने 94.80 टक्के गुणांसह पाचवा क्रमांक मिळविला. मराठी माध्यमातून चि. हितेश दीपचंद जाधव याने 90.20 टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकाविला. कु. खुशी सुनील डांबरे हिने 89.60 टक्के गुणांसह द्वितीय, कु. मयुरी गणेश पाटील हिने 89 टक्के गुणांसह तृतीय, कु. हर्षाली अमर सूर्यवंशी हिने 87 टक्के गुणांसह चतुर्थ तर कु. चेतना हिम्मत मोहने हिने 86.60 टक्के गुणांसह पाचवा क्रमांक मिळविला. या यशाबद्दल संस्थेचे चेअरमन दादासाहेब संजयरावजी गरुड, व्हॉइस चेअरमन आबासो भीमराव शेळके, सचिव काकासो सागरमलजी जैन, सहसचिव दादासो यू.यू. पाटील, कार्यालयीन सचिव भाऊसो दीपकजी गरुड, वस्तीगृह सचिव गो.गो. सूर्यवंशी, महिला संचालिका ताईसो उज्वला काशीद तसेच सर्व संचालक मंडळ यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. तसेच विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्या श्रीमती पी.एस. पाटील, उपप्राचार्य बी.एम. कुमावत, पर्यवेक्षक जे.एस. जुबंळे, विनोद पाटील तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल परिसरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
जामनेरात स्विमिंग पुलाच्या आउटलेट असलेल्या चेंबर मध्ये ५ वर्षाच्या मुलाचा बुडून दुर्दैवी मृत्यू.दर्शनपार्क व एकुलती गावावर शोककळा.
जामनेर (प्रतिनिधी):- येथील सोनेश्वर मंदिराच्या पायथ्याशी असलेल्या स्विमिंग पुलाच्या आउटलेट असलेल्या हौदात ५ वर्ष वय असलेल्या कार्तिक ऊर्फ उत्कर्ष गणेश पाटील या चिमुकल्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना दी.३ रोजी संध्याकाळी ठीक ५ ते ६ वाजेच्या सुमारास घडली आहे.त्याचे सविस्तर असे की, मूळचे एकुलती येथील रहिवाशी व हल्ली दर्शन पार्क येथे स्थाईक असलेले व संजय दादा गरूड यांच्या संस्थेत तोंडापूर येथे क्लार्क म्हणून कार्यरत असलेले गणेश पाटील हे आपल्या ५ वर्षाच्या कार्तिक व आपल्या मुलीसह स्विमिंग पुलात पोहण्याचा आनंद घेण्यासाठी गेले होते. संध्याकाळी पोहण्याचा आनंद घेतल्या नंतर ते ओले झालेले कपडे बदलवण्यासाठी आपल्या मुलांना घेऊन रूम मध्ये गेले होते. मात्र कार्तिक हा त्यांची नजर चुकवून आउटलेटचे वाहते पाणी बघून त्या पाण्याचा आनंद घेण्यासाठी पुढे पुढे जात आउटलेटचे पाणी ज्या ठिकाणी जमा होते. त्या चेंबर पर्यन्त गेला असता त्याचा चेंबर मध्ये तोल जाऊन तो चेंबर मध्ये असलेल्या पाण्यात बुडाल्याची माहिती स्थानिक रहिवाश्यांनी दिली असून एक मिनिटही न सोडणाऱ्या गणेश पाटील व त्यांच्या फॅमिलिवर मात्र कार्तिकच्या जाण्याने वज्रघात झाला आहे. या ठिकाणी घडलेल्या घटनेची चर्चा होताच कार्तिकला शोधण्यासाठी बरेच लोक स्विमिंग पुलाच्या पाण्यात उतरून शोध घेत होते. मात्र आउटलेटच्या पाण्याकडे कोणाचेही लक्ष न गेल्याने कार्तिकला शोधायला बराच वेळ लागला त्यामुळे त्याला जीवदान देता आले नाही. अशी खंत उपस्थित शोध कार्य करणाऱ्या लोकांनी व्यक्त केली आहे. तरीही त्याठिकाणी सुरक्षितता म्हणून ज्या ठेकेदाराला कॉन्ट्रॅक्ट दिला आहे. त्यांचे ट्रेनर वा सिक्युरिटी गार्ड त्या ठिकाणी नसल्याची चर्चा शहरात होतांना दिसून येत आहे. कदाचीत त्यामुळे कार्तिक चा जीव वाचवता आला असता अशी खंत व्यक्त करतांना जामनेर नागरीक दिसून येत आहे.कार्तिक च्या पच्च्यात आई, वडील, काका, आजी, आजोबा, काका,काकू आणि ११ वर्षाची बहीण असा परिवार आहे.
अटलांटा प्रकरण मुख्यमंत्र्यांचे फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश
जळगाव (नितीन सोनवणे) : मुंबईतील वर्षा बंगला येथे आज सायंकाळी झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत जळगाव महानगरपालिकेशी संबंधित अटलांटा कन्स्ट्रक्शन प्रकरणाला निर्णायक वळण मिळाले.जळगाव शहर पोलीस ठाण्यात अटलांटा कन्स्ट्रक्शन कंपनीविरुद्ध नगरसेवक अरविंद देशमुख यांनी यापूर्वीच फौजदारी तक्रार दाखल केली होती. या तक्रारीत महापालिकेची आर्थिक फसवणूक, विश्वासघात आणि कोट्यवधी रुपयांचा अपहार झाल्याचे गंभीर आरोप करण्यात आले आहेत.आज या पार्श्वभूमीवर नामदार गिरीश महाजन आमदार राजू मामा भोळे, नंदू आडवाणी, मनोज काळे आणि तक्रारदार नगरसेवक अरविंद देशमुख यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीत अरविंद देशमुख यांनी स्वतः दाखल केलेल्या तक्रारीचा सविस्तर संदर्भ मांडत प्रकरणातील वस्तुस्थिती स्पष्ट केली.मुख्यमंत्र्यांनी संपूर्ण बाब गांभीर्याने ऐकून घेतल्यानंतर तात्काळ दखल घेत जळगाव महानगरपालिकेचे आयुक्त ज्ञानेश्वर ढोरे यांना दूरध्वनीद्वारे संपर्क साधत सरकारी फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे स्पष्ट आदेश दिले, अशी माहिती समोर आली आहे.या आदेशामुळे अटलांटा प्रकरणातील तपास प्रक्रियेला अधिकृत गती मिळणार असून, महापालिका प्रशासनाकडून थेट कारवाई होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. विशेष म्हणजे, आधीच नगरसेवक अरविंद देशमुख यांनी दाखल केलेल्या तक्रारीमुळे या प्रकरणाची गंभीरता अधोरेखित झाली होती; आता त्याच संदर्भावर शासनस्तरावरून ठोस पाऊल उचलले गेल्याने दोषींवर कठोर कारवाई होण्याची शक्यता अधिक बळकट झाली आहे.जळगाव शहरात या घडामोडीमुळे मोठी राजकीय व प्रशासकीय हालचाल निर्माण झाली असून, संपूर्ण प्रकरणाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
