जामनेर तालुक्यात महाविकास आघाडीची बैठक संपन्न — नगरपालिका निवडणूक एकत्र लढवण्याचा निर्णय

जामनेर (प्रतिनिधी) :जामनेर नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक प्रकाश पाटील यांच्या मातोश्री निवासस्थानी पार पडली. या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना (उबाठा गट) आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्र येऊन आगामी नगरपालिका निवडणूक एकत्रितपणे, महाविकास आघाडी म्हणून लढवण्याचा सर्वानुमते निर्णय घेतला. या बैठकीस शिवसेनेचे नवनिर्वाचित जिल्हाप्रमुख श्री. योगीराज पाटील, जिल्हा संघटक अशोकभाऊ शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिलीपभाऊ खोडपे, डिके दादा पाटील, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष किशोर पाटील, शिवसेनेचे तालुकाप्रमुख ॲड. प्रकाश पाटील, उपतालुकाप्रमुख सुधाकर शेठ सराफ, शहरप्रमुख निशामुद्दीन शेठ, नानाभाऊ जंजाळ, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष एस. टी. पाटील, सौ. ज्योत्स्ना विसपुते, ॲड. चोपडे आदी मान्यवर उपस्थित होते. बैठकीत सर्व पक्षांनी एकजुटीने काम करण्याचा आणि जामनेर नगरपालिकेत सत्ता प्रस्थापित करण्याचा निर्धार व्यक्त केला. महाविकास आघाडीच्या या निर्णयामुळे आगामी निवडणुकीत जामनेरमधील राजकीय समीकरणांमध्ये चुरस वाढण्याची चिन्हे दिसत आहेत.

Read More

जिल्हास्तरीय लोकशाही दिन संपन्न; तक्रार निवारणास गती

महाराष्ट्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार नागरिकांच्या समस्या थेट ऐकून त्यांचे त्वरित निराकरण करण्याच्या उद्देशाने जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव येथे जिल्हास्तरीय लोकशाही दिन उत्साहात पार पडला. या उपक्रमामुळे नागरिक व प्रशासन यांच्यात थेट संवाद साधला जाऊन तक्रार निवारण प्रक्रियेला गती मिळाली.या वेळी नागरिकांनी विविध शासकीय विभागांशी संबंधित तक्रारी, निवेदने व मागण्या मांडल्या. प्रत्येक अर्जाची अधिकृत नोंद घेऊन तक्रारदारांचे म्हणणे संयमाने ऐकून घेण्यात आले. संबंधित विभागप्रमुख व क्षेत्रीय अधिकाऱ्यांवर तक्रारींच्या तातडीने निपटाऱ्याची जबाबदारी निश्चित करण्यात आली.प्रलंबित प्रकरणे ठराविक कालावधीत निकाली काढण्याचे तसेच संबंधित नागरिकांना त्याची माहिती देण्याचे स्पष्ट निर्देश प्रशासनाकडून देण्यात आले. तक्रार निवारण प्रक्रियेत पारदर्शकता, नियमबद्धता आणि तटस्थता राखण्यावर विशेष भर देण्यात आला.लोकशाही दिन हा केवळ तक्रारी मांडण्याचा मंच नसून सुशासन आणि लोकसहभाग यांचा प्रभावी दुवा असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले. प्रशासन नागरिकांच्या समस्या संवेदनशीलतेने हाताळून त्यांचे वेळेत निराकरण करण्यासाठी कटिबद्ध असल्याचेही स्पष्ट करण्यात आले. “नागरिकांच्या समस्यांकडे संवेदनशीलतेने पाहून त्यांचे विहित कालावधीत निराकरण करणे हे प्रशासनाचे प्राथमिक कर्तव्य आहे. लोकशाही दिनामुळे प्रशासन थेट जनतेच्या संपर्कात येऊन कामकाज अधिक गतिमान होत आहे,” असे जिल्हा प्रशासनाने सांगितले.

Read More

भुसावळमध्ये 30 हजारांची लाच घेताना सहकार विभागातील अधिकारी व दोन लेखापरीक्षक एसीबीच्या जाळ्यात

जळगाव, दि. 15 जून : भुसावळ येथील सहायक निबंधक, सहकारी संस्था कार्यालयाशी संबंधित एका प्रकरणात सहकार अधिकारी व दोन लेखापरीक्षकांना 30 हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहात पकडले. ही कारवाई सोमवारी भुसावळ शहरात करण्यात आली. एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदाराला सावकारी व्यवसायासाठी आवश्यक परवाना काढायचा होता. त्यासाठी संबंधित कार्यालयात अर्ज केल्यानंतर परवाना मंजूर करून देण्यासाठी सहकार अधिकारी विजय विनायक गारूड (वर्ग-3) यांनी 20 हजार रुपयांची लाच मागितल्याचा आरोप आहे. याबाबत तक्रारदाराने एसीबीकडे तक्रार दाखल केली होती.तक्रारीची पडताळणी केल्यानंतर एसीबीने सापळा रचला. तपासादरम्यान सुरेश जनार्दन विसपुते आणि हेमंत प्रकाश काळे या प्रमाणित लेखापरीक्षकांनी संबंधित अधिकाऱ्यांसाठी व स्वतःसाठी मिळून 30 हजार रुपयांची लाच मागितल्याचे निष्पन्न झाले.सोमवारी भुसावळ शहरातील नाहाटा चौफुली परिसरात सापळा कारवाईदरम्यान सुरेश विसपुते यांनी तक्रारदाराकडून 30 हजार रुपयांची लाच स्वीकारली. त्यानंतर एसीबीने त्यांना ताब्यात घेतले. या प्रकरणी विजय गारूड, सुरेश विसपुते आणि हेमंत काळे यांच्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा 1988 अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक हेमंत नागरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पुढील तपास एसीबीकडून सुरू आहे.

Read More

1 महिना साखर खाणे बंद केल्यास शरीरात काय बदल होतात? जाणून घ्या थक्क करणारे फायदे

आजकाल आपल्या रोजच्या आहारात साखरेचे (Added Sugar) प्रमाण खूप वाढले आहे. चहा, कॉफी, मिठाई, बिस्किटे, केक, कोल्ड ड्रिंक्स आणि अनेक पॅकबंद अन्नपदार्थांमध्ये साखरेचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. जर एखाद्या व्यक्तीने सलग 30 दिवस म्हणजेच 1 महिना साखर न खाण्याचा किंवा तिचे प्रमाण अत्यंत कमी करण्याचा निर्णय घेतला, तर शरीरात अनेक सकारात्मक बदल दिसून येतात. सुरुवातीच्या काही दिवसांत गोड खाण्याची तीव्र इच्छा (Sugar Cravings) होऊ शकते, परंतु हळूहळू शरीर या बदलाशी जुळवून घेते. 1 महिना साखर सोडल्यास शरीरावर काय परिणाम होतात, ते खालीलप्रमाणे: Effects Of Quitting Sugar On Body : 1 महिना साखर सोडण्याचे प्रमुख फायदेगोड खाण्याची सवय कमी होते : सुरुवातीचे काही दिवस वारंवार गोड खावेसे वाटू शकते. परंतु हळूहळू शरीराला कमी साखरेची सवय होते. यानंतर फळांसारखे नैसर्गिक गोड पदार्थही पूर्वीपेक्षा जास्त गोड आणि चवदार वाटू लागतात. वजन कमी होण्यास मदत : गोड पदार्थांमध्ये कॅलरीजचे प्रमाण खूप जास्त असते. कोल्ड ड्रिंक्स, मिठाई, बेकरी प्रॉडक्ट्स आणि साखरेचे पेय बंद केल्याने शरीरात जाणाऱ्या अतिरिक्त कॅलरीज थांबतात, ज्यामुळे वजन वेगाने कमी होण्यास मदत होते. दिवसभर टिकून राहणारी ऊर्जा : जास्त गोड खाल्ल्यानंतर शरीरात अचानक एनर्जी वाढल्यासारखी वाटते, पण थोड्याच वेळात रक्तातील साखर वेगाने खाली येते आणि थकवा जाणवतो. साखर बंद केल्याने रक्तातील साखरेची पातळी स्थिर राहते आणि दिवसभर उत्साह टिकून राहतो. दातांचे आरोग्य सुधारते : साखरेमुळे तोंडात घातक बॅक्टेरिया वाढतात, जे आम्ल (Acid) तयार करून दातांना कीड (Cavity) लावतात. 1 महिना साखर बंद केल्याने दातांचे आरोग्य उत्तम राहते. त्वचेमध्ये सुधारणा आणि पिंपल्स कमी : जास्त साखरेच्या सेवनामुळे शरीरात दाह (Inflammation) वाढतो, ज्यामुळे चेहऱ्यावर पिंपल्स येतात. साखर सोडल्याने त्वचा अधिक ताजी आणि चमकदार दिसू लागते. आहाराच्या उत्तम सवयी : 1 महिना साखर न खाल्ल्याने आपल्याला कळून येते की आपण रोज किती अनावश्यक गोड खात होतो. यामुळे पॅकबंद पदार्थांवरील ‘Added Sugar’ चे लेबल वाचण्याची आणि संतुलित आहार घेण्याची चांगली सवय लागते. जर तुम्हाला मधुमेह (Diabetes) किंवा इतर आरोग्य समस्या असतील, तर आहारात असा कोणताही मोठा बदल करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.🩺आरोग्य हीच खरी संपत्ती!

Read More

गरुड विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य आर एस चौधरी यांना निरोप

गरुड विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य आर एस चौधरी यांना निरोप धी.शेंदुर्णी से.एज्यु.को-ऑप सोसायटी संचलित,आ.ग.र.गरुड माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालय शेंदुर्णी येथे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य आर एस चौधरी यांच्या शेंदुर्णी एज्युकेशन सोसायटीतील प्रदीर्घ अशा सेवेनंतर वयो काल मर्यादे नुसार सरांना सेवापूर्तीनिमित्त निरोप देण्यात आला.याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव काकासो.सागरमलजी जैन यांच्या समवेत संस्थेचे सहसचिव दादासो यु यु पाटील, शेंदुर्णी शहराचे प्रथम नागरिक गोविंद जी अग्रवाल,माजी शिक्षक आमदार सुधीरजी तांबे,प्रमुख व्याख्याते माजी शिक्षणाधिकारी निळकंठजी गायकवाड,युवा नेतृत्व भैय्यासाहेब स्नेहदीपजी गरुड,ज.जि.माध्य. शिक्षक पतपेढीचे माजी अध्यक्ष एस.डी भिरुड, महिला संचालिका उज्वलाताई काशीद,ज.जि माध्यमिक पतपेढी माजी अध्यक्ष संभाजी पाटील मार्गदर्शक जुक्टो संघटना बापूसो.सुनील गरुड वस्तीगृह सचिव गो.गो.सूर्यवंशी , ज जि माध्यमिक पतपेढी माजी अध्यक्ष आर एच बाविस्कर, अध्यक्ष मुख्याध्यापक संघ जळगांव गोपाल पाटील,जि प्रे सो चेअरमन दगडू विष्णू पाटील, शेदुणी संस्थेचे सह सचिव यु यु पाटील चेअमन वस्तीगृह किशोर मानसिंग पाटील, शेंदुणी संस्था संचालक विजयराव ज्ञानदेवराव गरुड जिल्हा मुख्याध्यापक संघ सचिव आर ए पाटील मुख्याध्यापक जामनेर तालुका अध्यक्ष प्रमोद खलसे, माजी उपसभापती सुधाकर अण्णा बारी माजी पचायत सदस्य डाॅ किरण सुर्यवंशी, प्रदिप धनगर, प्राचार्य संजय भोळे, एस के पाटील जुक्टो संघना जळगांव शैलेश राणे, ए ए पटेल, जैन चाॅरिटीजचे व्यवस्थापक विनोद सिंह राजपूत, ज जि माध्यमिक पतपेढी संचालक सिध्देश्र्वर वाघुळदे, जे पी सपकाळ, जावळेसर, भावेश अहिरवार, आबा पाटील, नाईक सर आरिफ सर या मान्यवरांसह अनेक मान्यवर व्यास मंचावर उपस्थित होते.प्रथमतः कार्यक्रमाचे प्रास्ताविक किमान कौशल्य विभागाचे प्रमुख शैलेंद्र शेळके यांनी प्रास्ताविकात चौधरी सरांच्या जीवन प्रवासाबद्दल माहिती कथन करत.सरांचे वडील प्राथमिक शिक्षक होते तर पाचवीत असतानाच पितृछत्र हरपल्याने संघर्षमय जीवन जगत असताना त्यांच्या मातोश्री अंजनाबाई या नाचनखेडा गावात सतत दहा वर्ष वि. का. सोसा. संचालिका म्हणून कार्यरत असल्याचं त्यांनी सांगितलं शेंदुर्णी संस्थेत 1991 पासून तर आजतागायत 34 वर्ष 7 महिने एवढा मोठा कालावधी शिक्षक, पर्यवेक्षक, उप मुख्याध्यापक प्राचार्य कमऀचारी प्रतिनिधि,इथपर्यंत इमाने इतबारे सरांनी पार पाडला.विद्यार्थी हित कर्तव्य म्हणजे राज्य पातळी ते राष्ट्रीय पातळीपर्यंत सरांचे विद्यार्थी खेळामध्ये चमकलेत. त्यांच्या धर्मपत्नी चित्राताई तसेच मुलगा दिनेश व मुलगी प्रियंका या आपल्या कुटुंबाला वेळ देत त्यांनी सामाजिक कार्य तसेच शिक्षक संघटनांच्या माध्यमातून शिक्षकांवर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्याचे काम सरांनी केले.तसेच समाजाशी एकरूप होऊन सामाजिक बांधिलकी त्यांनी जोपासल्याचे प्रास्ताविकातून शेळके सरांनी व्यक्त केले.तद्नंतर,बऱ्याच मान्यवरांनी सरांच्या जीवनकार्याची यशोगाथा सांगितली त्यात,गोविंदजी अग्रवाल,निळकंठजी गायकवाड,सुधीरजी तांबे,संभाजी पाटील, सुनिल गरड, यु यु दादा पाटील या मान्यवरांसह विद्यार्थी मनोगतात भाग्यश्री नाईक,अथर्व पाटील यांनी सरांच्या आठवणींना उजाळा दिला.तसेच सत्कारार्थी मनोगतात सरांनी देखील आपल्या भावनांच्या वाटा मोकळ्या करत आपल्यावर प्रेम करणाऱ्या प्रेमी जणांचे तसेच संस्थेचे श्रद्धास्थान आचार्य बापूसाहेब गजाननराव गरुड अण्णासाहेब भास्करराव गरुड, तसेच दादासाहेब संजय रावजी गरुड व संस्था यांच्या ऋणात राहून मी सदैव संस्थेच्या हित जोपासण्यासाठी तत्पर असल्याचं त्यांनी यावेळी नमूद केले. तद्नंतर अध्यक्षीय मनोगतात शेंदुणी संस्थेचे सचिव काकासो.सागरमल जैन यांनी देखील आपले भावनिक विचार मांडले, प्रमुख उपस्थित मान्यवरांसह उपनगराध्यक्ष शरद बारी,नगरसेवक शांताराम बापू गुजर,टी.जे पाटील, नगरसेविकापती सुनील शिनकर माजी सरपंच नाचणखेडे हर्षल पाटील,सरपंच कैलास पाटील राजेंद्र पाटील सोयब पटेल अरुण कुलकर्णी, संजय गोतमारे,राजेद्र चौधरी, सुनिल चौधरी,,,एन ओ पाटील,सर,सुनंदाताई,बडोला हायस्कूल मुख्याध्यापिका श्रीमती पी एन पाटील,जुक्टो संघटनेचे शैलेश राणे,जे पी सपकाळे,व्ही के चौधरी,एस एस पाटील, एस टी पाटील, पी पी पाटील,एस के पाटील, पी आर गरुड, पी एल पाटील, राठी बापू, एस टी चिचोले,एस आर निकम, ए व्ही पाटील,पत्रकार विलास अहिरे, पंडित सर,एस टी पाटील,संगमनेर येथील महेश दिघे या मान्यवरांसह आप्तेष्ट नातेवाईक व इतर मित्र परिवार तसेच संस्थेतील आजी-माजी मुख्याध्यापक,महाविद्यालयाचे प्राचार्य, संजय भोळे,उप प्राचार्य,श्याम साळुंखे, कनिष्ठ महाविद्यालयाचे उप प्राचार्य बी एम कुमावत, पर्यवेक्षक जे.एस.जुबंळे, विनोद पाटील इत्यादी मान्यवर उपस्थित होते.सरांना सेवापूर्तीच्या शुभेच्छा दादासाहेब संजयरावजी गरुड तसेच भाऊसो.दीपक जी गरुड व इतर पत्रकार बांधव, शिक्षक आमदारकिशोरजी दराडे, ग स सोसायटी अध्यक्ष अजबसिंग पाटील या मान्यवरांनी दूरध्वनीवरून शुभेच्छा कळविल्याचे समजले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पी.जी. पाटील यांनी केले तर आभार पी.पी. पाटील यांनी मानले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले

Read More

चार लाख रुपये समुदाय गुंतवणूक निधी व्यवसायासाठी बचत गटांना वाटप

जळगाव ता. जि. जळगावआज जळगाव तालुक्यातील वसंतवाडी येथे महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत पद्मालय महीला प्रभाग संघातील म्हसावद बोरणार प्रभागातील श्री स्वामी समर्थ ग्रामसंघ वसंतवाडी यांच्या माध्यमातून चार लाख रुपये समुदाय गुंतवणूक निधी व्यवसायासाठी बचत गटांना वाटप करण्यात आला होता त्या बचतगटाच्या महिलांनी वसंतवाडी व जळके बस स्थानक याठिकाणी शॉपिंगगाळे भाडेतत्त्वावर घेऊन आपल्या व्यवसायाला आज जळगाव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती मिनल करणवाल यांच्या हस्ते फित कापुन सुरुवात केली. यात आदर्श समुहातुन सौ. सोनाली नरेंद्र पाटील यांना चहा फरसाण उपहारगृहासाठी, शिवकृपा समुहातील सौ. सोनाली लक्ष्मण पाटील यांना पाणी पुरी स्टॉलसाठी, आदर्श समुहातील सौ. अनिता धनराज पाटील साडी विक्री सेंटरसाठी, उडान स्वयंसहाय्यता समुहातील सौ. कविता सोनवणे यांना शिवणकामसाठी तर सत्यमेव जयते समुहातील सौ. सरला संजय दांडगे फुटवेअर विक्री अशा वेगवेगळ्या व्यवसायासाठी प्रत्येकी पन्नास हजार रुपये उपजीविकेसाठी निधी प्राप्त करून देण्यात आल्याची माहिती रविंद्र सुर्यवंशी महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान तालुका व्यवस्थापक यांनी दिली. यावेळी जळगाव जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक राजु लोखंडे, जळगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सरला पाटील, प्रभाग समन्वयक जळगाव दिनेश न्हाळदे, स्वप्नील पाटील पंचायत समिती जळगाव, सरुबाई जाधव वावडदा, कल्पना ठोंबरे विटनेर, विद्या पाटील पाथरी, मालुबाई पाटील वसंतवाडी, मोनिका पाटील जळके, रपेशा पाटील वडली या सर्व C.R.P. तसेच साधना सपके वसंतवाडी बॅक सखी, मनिषा पाटील वडली पशुसखी, वैशाली घाडगे विटनेर पशुसखी, विजया पाटील वावडदा कृषी सखी, तसेच जळगाव जिल्हा दुध संघाचे संचालक रमेश पाटील, जळगाव जिल्हा शिवसेना (शिंदे गट) शेतकरी संघटनेचे उपाध्यक्ष पि.के. पाटील, वसंतवाडी सरपंच विनोद पाटील, ग्रामसेवक बबन वाघ, सामाजिक कार्यकर्ते दिपक पाटील व मोठ्या संख्येने बचत गट महीला व गावातील नागरिक उपस्थित होते.

Read More

जामनेर-पहूर मार्गावर ४०७ टेम्पोचा भीषण अपघात; दोन हमालांचा जागीच मृत्यू

शेंदुर्णीजवळ टायर फुटल्याने वाहनावरील नियंत्रण सुटल्याची प्राथमिक माहिती; पोषण आहाराच्या गोण्यांसह हमाल रस्त्यावर फेकले गेल्याचे वृत्त जामनेर : जामनेर-पहूर मार्गावर शेंदुर्णीजवळ मंगळवार, दि. १५ सप्टेंबर २०२६ रोजी शालेय पोषण आहाराचे साहित्य घेऊन जाणाऱ्या ४०७ टेम्पोचा भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत वाहनासोबत असलेल्या दोन हमालांचा जागीच मृत्यू झाल्याचे प्राथमिक वृत्त आहे. अपघातानंतर परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, संबंधित ४०७ टेम्पोमध्ये शालेय पोषण आहाराच्या गोण्या भरून नेण्यात येत होत्या. शेंदुर्णीजवळ वाहनाचा टायर अचानक फुटल्याने चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याचे सांगण्यात येत आहे. त्यानंतर टेम्पो रस्त्यावर उलटला. अपघाताची तीव्रता एवढी होती की वाहनातील पोषण आहाराच्या गोण्यांसह दोन हमाल बाहेर फेकले गेल्याची माहिती समोर आली आहे. या दुर्घटनेत दोघांचा जागीच मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, अपघाताचे नेमके कारण, मृतांची ओळख आणि इतर तपशीलांची अधिकृत माहिती पोलिसांच्या पंचनामा व तपासानंतरच स्पष्ट होणार आहे. गोण्यांवर बसून प्रवास केल्याची माहिती अपघातानंतर सर्वाधिक गंभीर बाब समोर आली ती म्हणजे वाहनातील दोन हमाल पोषण आहाराच्या गोण्यांवर बसून प्रवास करत असल्याची माहिती. मालवाहू वाहनामध्ये कामगारांना अशा प्रकारे बसवून नेण्यात आले होते का, याचा तपास होणे आवश्यक आहे. जर तपासामध्ये हमालांना मालाच्या गोण्यांवर बसवून नेल्याचे स्पष्ट झाले, तर त्यांच्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न निर्माण होऊ शकतो. मालवाहू वाहनात प्रवास करणाऱ्या व्यक्तींसाठी सुरक्षित व्यवस्था करण्यात आली होती का, त्यांना अधिकृत आसनव्यवस्था होती का आणि वाहतूकदाराकडून सुरक्षेच्या नियमांचे पालन करण्यात आले होते का, याची चौकशी होणे गरजेचे आहे. शासकीय पोषण आहाराच्या वाहतुकीवरही प्रश्नचिन्ह या अपघातामुळे केवळ वाहनचालकाची जबाबदारी नव्हे, तर शालेय पोषण आहाराच्या वाहतुकीची संपूर्ण कार्यपद्धती तपासण्याची गरज निर्माण झाली आहे. संबंधित वाहनातून पोषण आहार नेमका कुठून कुठे पाठविण्यात येत होता, त्यासाठी वाहतूक आदेश कोणी दिला होता, संबंधित वाहनाची नियुक्ती कशा पद्धतीने करण्यात आली होती आणि वाहतूकदाराला कोणत्या अटी व नियम लागू करण्यात आले होते, याची पडताळणी होणे आवश्यक आहे. हा पोषण आहार पाचोरा येथून पाठविण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे. त्यामुळे माल कुठून उचलण्यात आला, कोणत्या शाळा किंवा वितरण केंद्रांसाठी तो पाठविण्यात आला होता, मालाचे प्रमाण किती होते आणि त्या वाहतुकीसाठी अधिकृत कागदपत्रे कोणती होती, याचीही चौकशी होण्याची शक्यता आहे. वाहनाच्या कागदपत्रांसह तांत्रिक तपासाची गरज अपघाताचे प्राथमिक कारण टायर फुटणे सांगितले जात असले, तरी टायर फुटण्यामागील नेमके कारण काय होते, याचाही तांत्रिक तपास आवश्यक आहे. वाहनाची यांत्रिक स्थिती, टायरची अवस्था, ब्रेक व इतर यंत्रणा, वाहनाची फिटनेस स्थिती, वाहनावर असलेले वजन आणि वाहनाचा वेग या सर्व बाबी तपासल्यानंतरच अपघातामागील नेमकी कारणे स्पष्ट होऊ शकतील. त्याचबरोबर वाहनाची आरसी, विमा, फिटनेस प्रमाणपत्र, परमिट तसेच चालकाचा परवाना वैध होता का, याचीही तपासणी होणे आवश्यक आहे. वाहनाच्या क्षमतेपेक्षा अधिक माल वाहून नेण्यात आला होता का, याचाही तपास महत्त्वाचा ठरणार आहे. दोन कुटुंबांवर दुःखाचा डोंगर या दुर्घटनेत दोन हमालांचा जीव गेल्याने त्यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. रोजंदारीवर काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या या कामगारांचा अशा दुर्घटनेत मृत्यू झाल्याने त्यांच्या कुटुंबाच्या भवितव्याचा प्रश्नही निर्माण झाला आहे. संबंधित कुटुंबांना शासनाकडून किंवा संबंधित यंत्रणेकडून मदत मिळणार का, याकडेही आता लक्ष लागले आहे. वाहतूक सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर जामनेर-पहूर मार्गावर घडलेल्या या दुर्घटनेमुळे मालवाहतूक करणाऱ्या वाहनांमध्ये कामगारांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. मालवाहू वाहनामध्ये कामगारांना सुरक्षिततेच्या नियमांकडे दुर्लक्ष करून प्रवास करावा लागत असेल, तर भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी संबंधित विभागाने कठोर पावले उचलण्याची गरज आहे. दरम्यान, या प्रकरणात पोलिसांकडून पंचनामा व तपासाची प्रक्रिया करण्यात येत असून, अपघाताचे नेमके कारण आणि दुर्घटनेसाठी कोणाची जबाबदारी निश्चित होते, हे तपासानंतरच स्पष्ट होणार आहे.

Read More

आपले सरकार’ सेवांतील विलंबावर आळा घालण्यासाठी अधिकाऱ्यांना दररोज एक हजार रुपये दंड लावण्याचे निर्देश

‘आपले सरकार’ सेवांतील विलंबावर आळा घालण्यासाठी अधिकाऱ्यांना दररोज एक हजार रुपये दंड लावण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालय, मुंबई येथे विविध सामाजिक क्षेत्रांसंदर्भातील वॉररूम बैठक पार पडली. बैठकीमध्ये ‘आपले सरकार’ पोर्टलवरील नागरिकांना मिळणाऱ्या विविध सेवा वेळेत आणि कार्यक्षम पद्धतीने उपलब्ध करुन देण्यावर भर देण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट निर्देश दिले की, सेवा वेळेत न पुरवणाऱ्या संबंधित प्रशासकीय विभाग प्रमुखांवर दररोज ₹1000 इतका दंड आकारण्यात यावा. तसेच, यासंदर्भात मुख्य सचिवांनी तात्काळ परिपत्रक जारी करावे, असेही निर्देश त्यांनी यावेळी दिले. राज्यात सेवा हक्क अधिनियमांतर्गत एकूण 1027 सेवा अधिसूचित करण्यात आल्या असून, त्यापैकी 527 सेवा सध्या ‘आपले सरकार’ पोर्टलवर कार्यरत आहेत. उर्वरित 138 सेवा 31 मे 2025 पर्यंत आणि राहिलेल्या 306 सेवा 15 ऑगस्ट 2025 पर्यंत ऑनलाईन करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. या डिजिटल योजनेच्या अंमलबजावणीसाठी ‘महाआयटी’ला ऑनलाईन प्रक्रियेचे प्रमाणीकरण करण्याचे निर्देश त्यांनी दिले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ऑक्टोबर 2025 पर्यंत महाराष्ट्राने सेवा डिजिटायझेशनमध्ये देशात आघाडी घेतली पाहिजे. तसेच, नागरिकांनी एका अर्जामार्फत अनेक योजनांचा लाभ घेता यावा यासाठी प्रणालीमध्ये आवश्यक सुधारणा करण्याचे आदेशही, मुख्यमंत्री यांनी यावेळी दिले. सामाजिक सुरक्षा योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी रिअल-टाईम ट्रॅकिंग प्रणाली सक्षम करण्यावरही भर देण्यात आला, जेणेकरून आदिवासी, शेतकरी, विद्यार्थी आणि सर्वसामान्य नागरिकांना योजनांची अचूक माहिती वेळेत मिळू शकेल. बैठकीत आदिवासी विकास विभागाच्या योजना, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांचे कार्यान्वयन आणि अ‍ॅग्रीस्टॅक उपक्रम यांचाही सविस्तर आढावा घेण्यात आला. आदिवासी विकास विभागाच्या संदर्भात, पीएम जनमन योजनेअंतर्गत सर्व उद्दिष्टे 2026 पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश मुख्यमंत्री यांनी यावेळी दिले. त्यात वाड्यापाड्यांमध्ये पायाभूत सुविधा, पक्की घरे, मोबाईल मेडिकल युनिट्सचे जिओटॅगिंग, बहुउद्देशीय केंद्रांचे हस्तांतरण आणि रस्त्यांसाठी विशेष निधीची तरतूद करून कामे गतीने पूर्ण करण्यावर भर देण्यात आला. त्याचबरोबर, नाशिक, नंदुरबार, पालघर आणि ठाणे जिल्ह्यांतील आदिवासी नागरिकांच्या मालमत्ताधिकारांचे प्रकरणे तातडीने निकाली काढावीत तसेच प्रधानमंत्री धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान (PM DA-JGUA) च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्य शासनाच्या 100 दिवसांच्या कृती आराखड्यानुसार 32 जिल्ह्यांमध्ये जिल्हास्तरीय समित्यांच्या माध्यमातून कार्यवाही केली जावी, असे निर्देशही त्यांनी यावेळी दिले. शासकीय वैद्यकीय शिक्षणविषयक धोरणाचा भाग म्हणून, राज्यातील 10 नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांच्या प्रकल्पांचा बैठकीत आढावा घेऊन, अंबरनाथ, वर्धा व पालघर येथे महाविद्यालयांसाठी जागा निश्चित करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले. भविष्यातील विस्तारासाठी किमान 20 एकर क्षेत्र राखीव ठेवण्याची आवश्यकता बैठकीत अधोरेखित करण्यात आली. यावेळी मंत्री डॉ. अशोक ऊईके, मंत्री ॲड. आशिष शेलार, मंत्री माणिकराव कोकाटे, मंत्री प्रकाश आबिटकर, राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर, राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल, राज्यमंत्री योगेश कदम यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

Read More

शेंदुर्णी-पाचोरा मार्गावरील अपघातांना जबाबदार कोण?; रस्ता विकासासोबत सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

शेंदुर्णी-पाचोरा | प्रतिनिधी शेंदुर्णी-पाचोरा मार्गावरील सुरू असलेल्या रस्ता रुंदीकरण व बांधकामाच्या कामामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. या मार्गावर यापूर्वी अनेक अपघात झाल्याचा दावा नागरिकांकडून केला जात असून, काही जण गंभीर जखमी झाले, तर काहींना कायमस्वरूपी अपंगत्वाला सामोरे जावे लागल्याचे सांगितले जाते. उपचारासाठी मोठा आर्थिक खर्च झाल्याने अनेक कुटुंबांवर आर्थिक संकट ओढवले आहे. त्यामुळे या मार्गावरील अपघातांची कारणमीमांसा करून सुरक्षिततेच्या उपाययोजना तातडीने करण्याची मागणी जोर धरत आहे. रस्ता बांधकामाच्या कामात कंत्राटदाराची भूमिका महत्त्वाची असली तरी कामावर देखरेख करणारे अभियंते, पर्यवेक्षक आणि संबंधित विभागाची जबाबदारीही तितकीच महत्त्वाची आहे. कंत्राटदाराकडून नियमांचे उल्लंघन होत असेल, तर ते रोखण्यासाठी देखरेख करणारी यंत्रणा काय करीत होती, हा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यामुळे चौकशी झाल्यास ती केवळ कंत्राटदारापुरती मर्यादित न ठेवता कंत्राटदार, पर्यवेक्षक, अभियंते, संबंधित विभागीय अधिकारी आणि सुरक्षा व्यवस्थेशी संबंधित सर्व स्तरांची भूमिका तपासणे आवश्यक ठरणार आहे. जुन्या पुलांसह संपूर्ण मार्गाचे स्ट्रक्चरल ऑडिट गरजेचेशेंदुर्णी-पाचोरा मार्गावरील गंभीर प्रश्नांपैकी एक म्हणजे जुन्या पुलांची आणि अन्य संरचनांची सद्यस्थिती. नागरिकांच्या म्हणण्यानुसार, मार्गाचे आधुनिकीकरण सुरू असले तरी ब्रिटिशकालीन पूल व जुन्या संरचनांची सध्याची स्थिती, त्यांची वाहतूक क्षमता आणि सुरक्षितता याबाबत पुरेशी माहिती सर्वसामान्यांना उपलब्ध नाही. वाढती वाहतूक आणि वाहनांचा वेग लक्षात घेता या जुन्या पुलांचे स्वतंत्र स्ट्रक्चरल ऑडिट करणे गरजेचे आहे. रस्ता रुंदावणे म्हणजे केवळ सिमेंट किंवा डांबराचा पृष्ठभाग तयार करणे नव्हे. रस्त्याचा पाया, भरावाची मजबुती, डांबरीकरणाचा दर्जा, रस्त्याची उंची-खोली, उतार-चढ, वळणे, पूल, मोऱ्या, पाण्याचा निचरा, साईड पट्टे, रोड मार्किंग आणि वाहतूक सुरक्षेची संपूर्ण व्यवस्था या सर्व बाबींचा एकत्रित विचार करणे आवश्यक आहे. काम सुरू असताना सुरक्षाव्यवस्थेवर प्रश्नचिन्हरस्ता रुंदीकरणाच्या कामादरम्यान अनेक ठिकाणी रस्त्याचे मूळ स्वरूप बदललेले दिसते. काही ठिकाणी खोदकाम, उंच-सखल भाग, अपूर्ण काम किंवा जुन्या व नव्या रस्त्याच्या भागातील फरक वाहनचालकांसाठी अडचणीचा ठरू शकतो. विशेषतः रात्रीच्या वेळी पुरेसे बॅरिकेडिंग, रिफ्लेक्टर, चेतावणी फलक, दिशादर्शक व्यवस्था आणि प्रकाशयोजना नसल्यास अपघाताचा धोका वाढू शकतो. अशा परिस्थितीत वाहनचालकाचा वेग हा अपघातामागील एक घटक असू शकतो; मात्र प्रत्येक अपघाताचे मूळ कारण केवळ वाहनाचा वेग आहे, असे गृहीत धरणे योग्य ठरणार नाही. रस्ता अपूर्ण होता का? अचानक मार्ग बदलला होता का? रस्त्यावर अडथळे होते का? कामाचे साहित्य पडले होते का? रात्री पुरेशी दृश्यता होती का? सूचना फलक आणि बॅरिकेडिंग होते का? या सर्व बाबींची घटनास्थळाच्या परिस्थितीनुसार तपासणी होणे आवश्यक आहे. पाळधी-जळगाव बायपासच्या घटनांनंतर धडा घेण्याची गरजपाळधी-जळगाव बायपासवरील घटनांनंतर रस्ते बांधकामाच्या दर्जासोबतच सुरक्षाव्यवस्थेची जबाबदारीही चर्चेत आली आहे. मोठी दुर्घटना घडल्यानंतर कारवाई करण्यापेक्षा संभाव्य धोके आधीच ओळखून ते दूर करणे ही प्रशासनाची खरी कार्यक्षमता ठरते. त्यामुळे जिल्ह्यातील सुरू असलेल्या रस्ते प्रकल्पांचीही प्रतिबंधात्मक पद्धतीने पाहणी करण्याची आवश्यकता आहे. शेंदुर्णी-पाचोरा मार्गावर आतापर्यंत झालेल्या अपघातांची अधिकृत माहिती संकलित करून अपघातस्थळांचे नकाशीकरण करावे. प्रत्येक ठिकाणी अपघाताची कारणे, रस्त्याची स्थिती, वाहतुकीचे प्रमाण, वळणे, पूल, प्रकाशव्यवस्था आणि कामाची सद्यस्थिती यांचा स्वतंत्र अभ्यास करावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. कामाची गुणवत्ता आणि कागदपत्रे सार्वजनिक करण्याची मागणीरस्ता बांधकामाच्या मंजूर आराखड्याची प्रत, कामाची मुदत, कामाची प्रगती, गुणवत्ता तपासणीचे अहवाल आणि सुरक्षा मानकांचे पालन याबाबत संबंधित विभागाने पारदर्शक माहिती सार्वजनिक करावी, अशीही नागरिकांची अपेक्षा आहे. कामाच्या ठिकाणी आवश्यक सूचना फलक, बॅरिकेडिंग, रिफ्लेक्टर आणि रात्रीची प्रकाशव्यवस्था आहे का, याची नियमित तपासणी होणे आवश्यक आहे. वाहनचालकांना पुढील रस्त्याची स्थिती स्पष्टपणे दिसेल, अशा पद्धतीने सुरक्षा उपाययोजना करण्यात याव्यात. चौकशी निष्पक्ष आणि तांत्रिक असावीदोषी कोण आहे, हे चौकशीतून स्पष्ट झाले पाहिजे; मात्र चौकशीपूर्वीच कोणालाही दोषी ठरवणे योग्य नाही. तपासात कंत्राटदाराची निष्काळजीपणा, कामातील तांत्रिक त्रुटी, सुरक्षाव्यवस्थेतील कमतरता किंवा संबंधित अधिकाऱ्यांची कसूर आढळल्यास कायद्यानुसार जबाबदारी निश्चित करून कारवाई झाली पाहिजे. त्याचवेळी रस्त्याचे काम तांत्रिक निकषांनुसार आणि आवश्यक सुरक्षा उपायांसह सुरू असल्याचे तपासात स्पष्ट झाल्यास वाहनचालकाची चूक, अतिवेग, वाहनाची तांत्रिक अवस्था किंवा इतर कारणांचाही निष्पक्षपणे तपास होणे आवश्यक आहे. मात्र “अपघात झाला आणि वाहनाचा वेग कारणीभूत होता” एवढ्या एका निष्कर्षावर संपूर्ण प्रकरण थांबवणे योग्य ठरणार नाही. अपघातामागील सर्व घटकांचा वैज्ञानिक, तांत्रिक आणि वस्तुनिष्ठ पद्धतीने अभ्यास होणे गरजेचे आहे. ‘आणखी किती अपघात झाल्यावर प्रशासन जागे होणार?’आज एखादा नागरिक जखमी होतो, उद्या त्याला कायमचे अपंगत्व येते, उपचारासाठी लाखो रुपये खर्च होतात आणि संपूर्ण कुटुंब आर्थिक संकटात सापडते. एखाद्या कुटुंबातील कमावता सदस्य गमावला तर त्या कुटुंबाचे आयुष्यच उद्ध्वस्त होते. त्यामुळे “आणखी किती अपघात झाल्यावर प्रशासन जागे होणार?” हा सवाल आता नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. शेंदुर्णी-पाचोरा हा परिसरातील महत्त्वाचा मार्ग असून या मार्गावर मोठ्या प्रमाणात दुचाकी, चारचाकी, मालवाहू आणि प्रवासी वाहतूक होत असते. त्यामुळे रस्त्याचे रुंदीकरण व आधुनिकीकरण निश्चितच आवश्यक आहे; मात्र विकासकामामुळे वाहनचालक आणि पादचाऱ्यांच्या जीविताला धोका निर्माण होणार नाही, याची जबाबदारी संबंधित यंत्रणेचीच आहे. रस्ता विकासाचा मार्ग असला पाहिजे; तो निष्पाप नागरिकांच्या बळीचा मार्ग ठरता कामा नये. त्यामुळे शेंदुर्णी-पाचोरा मार्गावरील कामाची स्वतंत्र, निष्पक्ष, तांत्रिक आणि वस्तुनिष्ठ चौकशी करून वस्तुस्थिती जनतेसमोर आणावी, दोषी आढळणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी आणि भविष्यातील अपघात टाळण्यासाठी तातडीने ठोस सुरक्षा उपाययोजना कराव्यात, अशी मागणी आता जोर धरत आहे.

Read More

जामनेर येथे राष्ट्रीय लोकन्यायालयात ३६० प्रकरणांचा निकाल

जामनेर, दि. १४ मार्च २०२६ – मा. उच्च न्यायालय मुंबई तसेच महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या निर्देशानुसार राज्यभर आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय लोकन्यायालयाचे आयोजन जामनेर येथे करण्यात आले. तालुका विधी सेवा समिती जामनेर तसेच दिवाणी व फौजदारी न्यायालय जामनेर यांच्या वतीने या लोकन्यायालयाचे आयोजन करण्यात आले होते. या लोकन्यायालयात मोठ्या प्रमाणावर पक्षकारांनी उपस्थिती दर्शविली. तहसील कार्यालय, महसूल विभाग, राष्ट्रीयकृत बँका, खाजगी पतसंस्था/बँका, बीएसएनएल, नगरपालिका, नगरपरिषद, महावितरण तसेच जामनेर तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींनीही मोठ्या प्रमाणावर सहभाग नोंदविला. सदर लोकन्यायालयात वादपूर्व प्रकरणे तसेच न्यायालयीन प्रलंबित प्रकरणे ठेवण्यात आली होती. वादपूर्व प्रकरणांपैकी ३०४ प्रकरणे निकाली काढण्यात आली असून त्यामध्ये २,०४,३६० रुपये इतक्या रकमेची तडजोड करण्यात आली. तसेच न्यायालयीन प्रलंबित प्रकरणांपैकी एकूण ५६ प्रकरणे निकाली काढण्यात आली. दिवाणी व फौजदारी तडजोडयोग्य प्रकरणांमध्ये ९०,८०० रुपये इतक्या रकमेची तडजोड करण्यात आली. वादपूर्व व न्यायालयीन प्रलंबित अशी मिळून एकूण ३६० प्रकरणे निकाली काढण्यात आली असून दोन्ही प्रकारच्या प्रकरणांमध्ये मिळून २,०५,३७,८८७ रुपये इतक्या रकमेची तडजोड करण्यात आल्याची माहिती आयोजकांकडून देण्यात आली.

Read More
error: Don't Try To Copy !!